मुंबई : 159 दिवसांत सायकलने जगप्रदक्षिणा करण्याचा विक्रम नावावर करणाऱ्या पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून कौतुक केले. वेदांगीला इटलीच्या पाऊलो जिअॅनोट्टीने 2014 मध्ये नोंदवलेला 144 दिवसांचा विक्रम मोडता आला नाही. मात्र, वेदांगी सर्वात जगप्रदक्षिणा करणारी आशियाई सायकलपटू ठरली आहे. 29,000 किलोमीटरचे अंतर पार करून ती कोलकाता येथे पोहोचली आहे. वेदांगीने ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथून या प्रवासाला सुरुवात केली होती.
वेदांगी ब्रिटनच्या बॉउर्नेमाउथ युनिव्हर्सिटीत स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा अभ्यास करत आहे. हा विक्रम करण्यासाठी तिने दोन वर्ष सराव केला. वेदांगीचा हा प्रवास प्रचंड खडतर होता. कॅनडात तिच्या मागे अस्वल लागला होता. त्यातच रुसमध्ये बर्फामध्येही ती अडकली होती. स्पेनमध्ये तिच्यावर चाकू हल्लाही झाल्याचे वृत्त आहे. वेदांगीने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, आइसलँड, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड आणि रुस येथून भारत असा प्रवास केला.
मन की बात मध्ये मोदी म्हणाले की,''सायकलवरून जगभ्रमंती करणारी वेदांगी ही आशियातील जलद महिला ठरली आहे. तिच्या विक्रमाचा अभिमान आहे.''