चीन खेळाडूंना देणार ‘ड्रग्ज’ न घेण्याची शपथ
By Admin | Updated: July 22, 2016 05:24 IST2016-07-22T05:24:29+5:302016-07-22T05:24:29+5:30
चीनने आपल्या सर्वांत मोठ्या पथकातील खेळाडूंना डोपिंगसाठी ड्रग्जचा अवलंब न करण्याची शपथ देण्याचे ठरविले आहे.

चीन खेळाडूंना देणार ‘ड्रग्ज’ न घेण्याची शपथ
शांघाय : जागतिक क्रीडा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या चीनने आपल्या सर्वांत मोठ्या पथकातील खेळाडूंना डोपिंगसाठी ड्रग्जचा अवलंब न करण्याची शपथ देण्याचे ठरविले आहे. या खेळाडूंची ड्रग्ज चाचणी तर होईलच, शिवाय शपथही दिली जाईल.
रिओ येथे ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत होत असलेल्या आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे ४१६ खेळाडूंचे पथक चीनचे राहील. यंदाच्या आॅलिम्पिकचे ब्रीद डोपिंगमुक्त खेळ असे आहे. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक कमिटीदेखील (आयओसी) डोपिंगप्रकरणी ‘झिरो टॉलरन्स’चा अवलंब करीत आहे. दुसरीकडे चीनने आपल्या खेळाडूंना प्रामाणिकपणा आणि खिलाडू वृत्तीची शपथ देण्याचा निर्णय घेतला. चीनच्या पथकात खेळाडू आणि अधिकारी अशा ७११ लोकांचा समावेश असेल. या पथकाचे नेतृत्व करीत असलेले क्रीडा उपसंचालक गाओ झिदान म्हणाले,‘जे खेळाडू आणि अधिकारी डोपिंग चाचणीच्या लेखी परीक्षेत नापास झाले, त्यांना आॅलिम्पिकला जाता येणार नाही. शिवाय नियमांचे कठोर पालन केले जाईल. खेळाडूंना लेखी परीक्षेत १०० पैकी ८० गुण मिळविणे अनिवार्य असेल’ (वृत्तसंस्था)
चीन डोपिंगच्या विरोधात आहे. डोपिंगबद्दल आमचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे. खेळात पारदर्शीपणा असावा आणि खेळाडूंचे हित जोपासले जावे, अशी आमची भावना आहे.