खेळाडूंनी ‘सुंदरीं’ना ठेवावे दूर
By Admin | Updated: September 11, 2014 01:54 IST2014-09-11T01:54:28+5:302014-09-11T01:54:28+5:30
आयसीसी विश्वचषक २०१५ चे आयोजन यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेला भ्रष्टाचार आणि सट्टेबाजीपासून मुक्त ठेवण्यासाठी क्रिकेटपटूंनी अनोळखी सुंदर तरुणींपासून दूर राहावे

खेळाडूंनी ‘सुंदरीं’ना ठेवावे दूर
नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०१५ चे आयोजन यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेला भ्रष्टाचार आणि सट्टेबाजीपासून मुक्त ठेवण्यासाठी क्रिकेटपटूंनी अनोळखी सुंदर तरुणींपासून दूर राहावे, असा सल्ला न्यूझीलंडच्या पोलीस प्रशासनाने दिला आहे.
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त आयोजनाखाली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सट्टेबाज सुंदर तरुणींच्या माध्यमातून खेळाडूंना फसवू शकतात. यामुळे न्यूझीलंड पोलिसांनी खेळाडूंना हा इशारा दिला आहे.
न्यूझीलंडमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, सॅँड्रा मॅँडरसन या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सट्टेबाज महिलांच्या मदतीने खेळाडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही या सट्टेबाजांना ओळखतो, ते महिलांचा वापर करून खेळाडूंवर प्रभाव टाकू शकतात. ते म्हणाले, या स्पर्धेदरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. अनेकवेळा खेळाडूंनी त्यांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिल्यास त्यांच्यासमवेत काढलेल्या महिलांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि विविध देशांच्या क्रिकेट संघटना मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही मॅच फिक्सिंगचे प्रयत्न होत आहेत. न्यूझीलंडच्या लू विन्सेट या खेळाडूला मॅच फिक्सिंगप्रकरणी शिक्षा भोगावी लागली आहे. त्याने आपली चूक कबूल केली आहे. तरीही पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान मॅच फिक्सिंगचा धोका आहे. (वृत्तसंस्था)