खेळाडूंसाठी परदेशात हेल्पलाईन हवी : अभिनव
By Admin | Updated: July 16, 2017 02:05 IST2017-07-16T02:05:05+5:302017-07-16T02:05:05+5:30
विदेशात खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे.

खेळाडूंसाठी परदेशात हेल्पलाईन हवी : अभिनव
नवी दिल्ली : विदेशात खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे.
बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेली नागपूरची पॅराजलतरणपटू कांचनमाला पांडे हिच्यावर दंड भरण्यासाठी रक्कम उधार घेण्याची वेळ आली होती. पॅरालिम्पिक समितीकडून स्पर्धेसाठी अॅडव्हान्स रक्कम न मिळाल्याने या खेळाडूला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
क्रीडामंत्री विजय गोयल यांना लिहिलेल्या पत्रात बिंद्रा म्हणतो, ‘बर्लिनमध्ये कांचनमालासोबत घडलेल्या घटनेकडे पाहिल्यास आमच्या खेळाडू व्यवस्थापनात अनेक चुका असल्याचे निष्पन्न होते. भारतीय क्रीडा क्षेत्रात अशा घटना वारंवार घडत असल्याने ज्या चांगल्या गोष्टी अमलात आणण्यात येतात त्यावर पाणी फेरले जाते. या संदर्भात विदेशात खेळाडूंसाठी हेल्पलाईन असावी अशी माझी सूचना आहे.
अत्यंत गंभीर प्रकरणे निकाली काढण्यासाठी खेळाडूंसाठी हेल्पलाईन असावी. विदेशात खेळाडूंना कुठलीही आर्थिक चणचण जाणवू नये आणि त्यांना वेळेवर सहाय्य मिळावे यासाठी हेल्पलाईनची गरज आहे. क्रीडा मंत्रालयाने या चांगल्या कामात पुढाकार घ्यायला हवा.’ (वृत्तसंस्था)