खेळाडूंची अद्याप डोप चाचणी नाही
By Admin | Updated: May 27, 2015 01:29 IST2015-05-27T01:29:44+5:302015-05-27T01:29:44+5:30
चीनमध्ये पुढील महिन्यात आयोजित आशियाई चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ तीन दिवसांनंतर रवाना होणार आहे,

खेळाडूंची अद्याप डोप चाचणी नाही
नवी दिल्ली : चीनमध्ये पुढील महिन्यात आयोजित आशियाई चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ तीन दिवसांनंतर रवाना होणार आहे, पण ट्रॅक अॅण्ड फिल्डमध्ये सहभागी होणाऱ्या किमान १० खेळाडूंची अद्याप डोप चाचणी झालेली नाही. त्यातील अनेक रिले धावपटू आहे, असे सूत्राने सांगितले.
त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतावर डोप चाचणी न झालेल्या खेळाडूंना पाठविण्याची वेळ येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण आता डोप चाचणी केली तरी ३० मे रोजी रवाना होण्यापूर्वी या चाचणीचा अहवाल मिळणे अशक्य भासत आहे.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) ३ ते ७ जून या कालावधीत वुहानमध्ये होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी २० खेळाडूंची निवड केली. त्यात रिले धावपटूंच्या (पुरुष व महिला ४ बाय १०० व ४ बाद ४०० मीटर) नावाची घोषणा बुधवारी पतियाळा व बेंगळुरू येथे होणाऱ्या चाचणीनंतर करण्यात येणार आहे.
नाडाने सोमवारी चाचणीनंतर रिले धावपटूंचे डोप नमुने घेण्याची सूचना केली होती. सूत्राने सांगितले की, ‘या महिन्याच्या सुरुवातीला ज्या वेळी विश्व डोपिंगविरोधी एजन्सीची समिती चाचणीसाठी तिरुवनंतपुरममध्ये साई-एसएनसीपीईमध्ये दाखल झाली, त्या वेळी काही खेळाडू उपस्थित नव्हते. त्यात मध्यम पल्ल्याच्या धावपटूंचा समावेश होता. त्यामुळे आता त्यांची डोपिंग चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.’ नाडाच्या समितीला खेळाडूंचे डोपिंग नमुने घेता यावे यासाठी महिलांची ४ बाय ४०० मीटर रिले संघाची ट्रायल तिरुवनंतपुरममधून एनआयएस पतियाळा येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका अॅथलेटिक्स प्रशिक्षकाचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की,‘ज्या वेळी वाडाची समिती तिरुवनंतपुरममध्ये पोहोचली, त्या वेळी मध्यम पल्ल्याचे किमान सात धावपटू उपस्थित नव्हते, हे आता जगजाहीर झालेले आहे. माहिती मिळाल्यामुळे वाडाची समिती येथे पोहोचण्याच्या एक दिवसापूर्वीच खेळाडू या केंद्राबाहेर पडले होते. एएफआयच्या अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य माहीत आहे. खेळाडूंची डोप चाचणी घेण्यासाठी त्यांनी ट्रायल तिरुवनंतपुरममधून पतियाळा येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. एनआयएस पतियाळा येथे नियमित डोपिंग परीक्षण करण्यात येते. बेंगळुरू व तिरुवनंतपुरमच्या तुलनेत तेथे चाचणीपासून बचाव करणे अधिक कठीण आहे. प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘रिले संघात कुणाची निवड होईल, याचा अंदाज घेणे कठीण नाही. त्यामुळे रिले धावपटूंचा विचार करताना आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवडण्यात येणाऱ्या संघातील किमान १० खेळाडूंची डोप चाचणी अद्याप शिल्लक आहे.’ (वृत्तसंस्था)
रिले धावपटूंची डोप चाचणी बुधवारी किंवा २८ मे रोजी होईल. नाडाला डोप चाचणी समिती पाठविण्यासाठी आम्ही पत्र लिहिले आहे.’ संघ रवाना होण्यापूर्वी डोप चाचणीचा अहवाल मिळण्याबाबत विचारले असता वाल्सन म्हणाले, ‘डोप चाचणीचा अहवाल ३६ ते ४८ तासांमध्ये मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.-सी. के. वाल्सन,
एएफआयचे सचिव