खेळाडू आत्महत्याप्रकरण दुख:द; जलद कारवाई
By Admin | Updated: May 13, 2015 23:21 IST2015-05-13T23:21:01+5:302015-05-13T23:21:01+5:30
भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात घडलेले खेळाडू आत्महत्या प्रकरण हे हृदय हेलावणारे आणि सर्वांत दुख:द असून, भविष्यात असे प्रकार घडू

खेळाडू आत्महत्याप्रकरण दुख:द; जलद कारवाई
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात घडलेले खेळाडू आत्महत्या प्रकरण हे हृदय हेलावणारे आणि सर्वांत दुख:द
असून, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी जलद कारवाई करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने बुधवारी दिले.
केरळमधील अलपुझा येथे साईच्या जलतरण केंद्रात ६ मे रोजी ४ महिला खेळाडूंनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात एका खेळाडूचा मृत्यू झाला. सर्व मुलींनी ‘ओथलंगा’ नावाचे विषारी फळ खाल्ले होते. या घटनेवर क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी लोकसभेत साईतील प्रशिक्षणव्यवस्था सुदृढ करण्यावर भर दिला. या संदर्भात साई महासंचालकाच्या शिफारशी तपासणार असल्याचे सांगितले. सोनोवाल यांच्या वतीने संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी म्हणाले, ‘‘या संदर्भात पोलीस, जिल्हा प्रशासन, राज्याच्या क्रीडा सचिवांमार्फत आणि राज्य मानवाधिकार आयोगामार्फत तपास करण्यात येत आहे. यामुळे कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. ही घटना दुख:द असून, साई प्रशिक्षण केंद्रात सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.’’ साई महासंचालकांनी या संदर्भात अनेक उपया सुचविले आहेत. त्यांत कौन्सिलिंग मानसोपचारतज्ज्ञाच्या नियुक्तीचाही समावेश आहे. या केंद्रात योग हा विषय सक्तीचा करणे, शारीरिक शोषणाच्या तक्रारीसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू करणे आदींचा समावेश आहे. साई महासंचालकांनी विविध लोकांशी संपर्क साधल्यानंतर काही उपाययोजना सुचविल्या आहेत. उपचार घेत असलेल्या तिन्ही मुलींचे कौन्सिलिंग करणे व त्यांचे भावनिक पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तज्ज्ञांकडून ज्या सूचना आल्या आहेत, त्यांवर सरकार विचार करील; शिवाय भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर कारवाई केली जाईल. साई महासंचालकांनी रुग्णालयात जाऊन तिन्ही मुलींची भेट घेतली; शिवाय मृत अपर्णा रामचंद्रन या मुलीच्या कुटुंबीयांचेदेखील
सांत्वन केले. (वृत्तसंस्था)