मुंबई - प्रो कबड्डीत दबंग दिल्ली संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मागील सहा मोसमात त्यांना केवळ एकदाच प्ले ऑफपर्यंत मजल मारता आलेली आहे. त्यांनी प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करून इतिहास घडवला होता. पण, त्यांची ही घोडदौड यूपी योद्धानं अडवली होती. तरीही संघाच्या कामगिरीवर कर्णधार जोगिंदर नरवालनं समाधान व्यक्त केलं होतं. आता नवीन हंगामात त्याच समाधानानं दबंद दिल्ली प्रतिस्पर्धींसमोर कडवं आव्हान देण्यासाठी उभे राहणार आहेत. आता प्ले ऑफ नाही, तर जेतेपदाचा चषकच, असा निर्धार जोगिंदरने केला आहे.


प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला 20 जुलैपासून सुरुवात होत आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात 20 जुलैला सलामीचा सामना हैदराबाद येथे होणार आहे. पहिल्याच दिवशी सध्याच विजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. 


यंदाची लीग ही साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. यंदाच्या मोसमात संघाच्या आत्मविश्वासाविषयी जोगिंदर म्हणाला,'' यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करण्यासाठी आम्ही कसून सराव करत आहोत. गतवर्षी आम्ही प्ले ऑफ पर्यंत मजल मारली होती. प्रो कबड्डीच्या इतिहासात आम्ही प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. आता त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आमचा संघ अधिक उत्तम आहे. त्यामुळे उपांत्य फेरी हे पहिले लक्ष्य आहे.''
यंदा प्रत्येक संघात बदल पाहायला मिळणार आहेत. मागील हंगामात सर्वांचे लक्ष वेधणारा मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे आणि सलामीलाच सिद्धार्थ विरुद्ध यू मुंबा असा सामना पाहायला मिळेल. राहुल चौधरी हा तमीळ थलायव्हाज संघात अजय ठाकूरसोबत खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कॅप्टन कुल अनुप कुमार आणि राकेश कुमार यंदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील. हे अनुक्रमे पुणेरी पलटन व हरयाणा स्टीलर्स यांचा सामना करतील. दिल्लीच्या संघातही असेच बदल पाहायला मिळणार आहेत आणि जोगिंदर त्याकडे सकारात्मक नजरेने पाहतो.
तो म्हणाला,'' आमच्या संघातील सर्वच खेळाडू दमदार आहेत. मेराज, चंद्रन, नवीन, निरज हे तगडे रेडर्स आमच्याकडे आहेत. त्यांच्यासाथीला विजय हा नवीन खेळाडू दाखल झाला आहे. संघात 6-7 नवे खेळाडू आहेत. संघात फार बदल नाहीत, परंतु नवीन खेळाडूंचाही आम्हाला फायदा होणार आहे. आमचा संघ संतुलित आहेत. त्यामुळे संघातील खेळाडूंमध्ये उत्तम बॉ़डिंग आहेत. फॉरमॅट बदलत असतात. आमचं काम आहे खेळाचयं आणि उपांत्य फेरी हे पहिले लक्ष्य आहे. पण, अंतिम ध्येय हे जेतेपदाचा ताज आहे.''

मुलासोबत प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर खेळण्याची इच्छा...
जोगिंदरचा मुलगा विनय हाही कबड्डीपटू आहे आणि त्याच्यासोबत प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर खेळण्याचे जोगिंदरचे स्वप्न आहे. तो म्हणाला,'' देवाची इच्छा असेल तर मी आणि माझा मुलगा प्रो कबड्डीत एकत्र खेळू.. तो आता 17 वर्षांचा आहे आणि त्यानं हरयाणाच्या 19 वर्षांच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तोही लेफ्ट कॉर्नरवर खेळतो आणि मीही त्याच पोझिशनवर खेळतो. जो मैदानावर चांगली कामगिरी करेल, त्याला संधी मिळेल." 


Web Title: PKL 2019 : Dabang Delhi captain Joginder singh Narwal say our aim to win pro kabaddi season 7 title
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.