खेळपट्टी कुणाची ‘फिरकी’ घेणार!
By Admin | Updated: November 17, 2016 06:34 IST2016-11-17T02:20:35+5:302016-11-17T06:34:36+5:30
राजकोटच्या फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर अपेक्षेनुरूप कामगिरी करता न आल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या भारतीय फिरकी गोलंदाजांना

खेळपट्टी कुणाची ‘फिरकी’ घेणार!
विशाखापट्टणम : राजकोटच्या फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर अपेक्षेनुरूप कामगिरी करता न आल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या भारतीय फिरकी गोलंदाजांना इंग्लंडविरुद्ध आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या निर्धारासह उतरावे लागेल. वैझागची खेळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जात आहे.
एसीएची खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला पूरक मानली जात असल्याने पाहुण्या फलंदाजांची येथे परीक्षा असेल. राजकोटमध्ये भारतीय फिरकीपटूंनी केवळ नऊ गडी बाद केले, तर इंग्लंडच्या चार
फलंदाजांनी शतक झळकविल्याने कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीविषयी जाहीर नाराजी दर्शविली होती. रविचंद्रन आश्विनने २३० धावा देत ३ गडी बाद केल्याने त्याच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह लागले होते. खराब कामगिरीमुळे गौतम गंभीरचे स्थान धोक्यात आले आहे. दुसरीकडे रणजीत चांगली कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला संघात स्थान मिळाले. फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर अतिरिक्त फलंदाज घेऊन खेळतो की आॅलराऊंडरला झुकते माप देतो, याकडे लक्ष असेल. पहिल्या सामन्यात अनेक झेल सोडणाऱ्या भारताला क्षेत्ररक्षणातही सुधारणा करावी लागेल.
भारताची भिस्त फिरकीवर असली, तरी चार वर्षांआधीचा अनुभव वाईट आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाविरुद्ध अहमदाबादचा पहिला सामना गमविल्यानंतरही इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली होती. यंदादेखील आमचा संघ चांगलाच असल्याची झलक देत भारताची वाट सोपी नाही, हे पाहुण्यांनी दाखवून दिले.
दुसऱ्या सामन्यात भारताची मुख्य भिस्त असेल ती आश्विन, जडेजा आणि मिश्रा यांच्या कामगिरीवरच! मिश्राने काही दिवसांआधी याच खेळपट्टीवर वन डेत न्यूझीलंडचे ५ गडी १८ धावांत बाद केले होते. फलंदाजीत चेतेश्वर पुजारा किंवा रहाणे यांना कोहलीसोबत मोठी खेळी करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल.
फिरकीतही इंग्लंडला कमकुवत मानता येणार नाही. संघाने पाकचा दिग्गज सकलेन मुश्ताकची सल्लागार म्हणून सेवा घेतली आहे. राशिदला सकलेनच्या सल्ल्याचा लाभ झाल्याचे राजकोट सामन्यानंतर सांगितले होते. फलंदाजीत सलामीचा हसीब हमीद याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. फिट झालेला वेगवान गोलंदाज जेम्स अॅन्डरसन खेळल्यास त्याला ख्रिस व्होग्सऐवजी स्थान मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघात कोण खेळतो, हे निश्चित होण्याआधी भारताने स्वत: काळजी घ्यावी. इंग्लंडला सहज
घेऊ नये, अन्यथा फिरकीला अनुकूल स्थिती आपल्यावरच उलटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (वृत्तसंस्था)
उभय संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), गौतम गंभीर, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, मोहम्मद शमी, लोकेश राहुल, इशांत शर्मा, हार्दिक पंड्या, करुण नायर आणि जयंत यादव.
इंग्लंड : अॅलिस्टर कूक (कर्णधार), हसीब हमीद, ज्यो रुट, बेन डकेट, मोईन अली, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टा, ख्रिस व्होक्स, आदिला राशिद, जफर अन्सारी, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅन्डरसन, गॅरी बॅलेन्स, गेरेथ बेटी, जोस बटलर, स्टीव्हन फिन आणि जॅक बॉल.