खेळपट्टीचे स्वरूप ठरवेल जय-पराजयाचे गणित!
By Admin | Updated: November 14, 2015 01:10 IST2015-11-14T01:10:50+5:302015-11-14T01:10:50+5:30
द. आफ्रिकेने पहिली कसोटी गमाविल्याने दुसऱ्या कसोटीआधी त्यांच्यावर दडपण असेल. ०-१ ने माघारल्यानंतर मुसंडी मारणे कठीण होते. पण मुसंडी मारण्याची क्षमता असलेला संघ म्हणजे द. आफ्रिका!

खेळपट्टीचे स्वरूप ठरवेल जय-पराजयाचे गणित!
द. आफ्रिकेने पहिली कसोटी गमाविल्याने दुसऱ्या कसोटीआधी त्यांच्यावर दडपण असेल. ०-१ ने माघारल्यानंतर मुसंडी मारणे कठीण होते. पण मुसंडी मारण्याची क्षमता असलेला संघ म्हणजे द. आफ्रिका!
मोहालीतील पराभवामुळे आफ्रिकेची एकाग्रता भंगली. भारतीय फिरकीला कसे तोंड द्यायचे, याचा विचार सतत डोक्यात असावा. भारतीय फिरकीपटूंचे वळण घेणारे चेंडू पाहुण्या फलंदाजांच्या स्वप्नात येत असावेत. उलट द. आफ्रिकेकडे फिरकीत मर्यादित पर्याय आहेत. इम्रान ताहिरचा अपवाद वगळता अन्य फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांची दांडी गुल करेल, असे मला वाटत नाही.
बंगळुरूची खेळपट्टी तशी फलंदाजांना पूरक मानली जाते. येथे चेंडू उसळी घेतात. ही खेळपट्टी शुष्क असावी, असे भारतीय संघव्यवस्थापनाला वाटत असावे. खेळपट्टी ‘फ्लॅट’ असेल, तर मात्र उभय संघांचे नुकसानच होईल. भारतीय संघाकडे मानसिक आघाडी आहे. दुसरीकडे स्टेन जखमी झाल्याने भारताची ही आघाडी दुप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुना चेंडू रिव्हर्स करण्याची कला स्टेनला आत्मसात आहे. त्याच्या अनुपस्थितीत अन्य कुणी अशी किमया साधेल, याची मला जाणीव नाही. याचा लाभ घ्यायचा झाल्यास भारतीयांनी मोठी फटकेबाजी करण्याआधी चेंडू जुना होण्याची प्रतीक्षा करावी. भारतासाठी चिंतेचा विषय ठरावा तो शिखर धवनचा फॉर्म. धवनने क्रिझवर धैर्याने फलंदाजी करावी. शॉटची निवड करताना संयम बाळगावा. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे सरळ बॅटने खेळावे. मी कर्णधार असतो तर त्याला संघात कायम ठेवलेच असते. तो फॉर्ममध्ये असेल तर विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरतो. एकूणच काय तर भारतीय संघ सध्या ‘ड्रायव्हर सीट’वर आहे. पण चार सामन्यांच्या मालिकेची ही सुरुवात ठरावी. भारत मालिका विजयाचा प्रबळ दावेदार आहे, यात शंका नाही पण पहिल्या कसोटीप्रमाणे बंगळुरूतही सर्व काही खेळपट्टीच्या स्वरूपावरच विसंबून असेल.
(टीसीएम)