संजय बांगरकडून खेळपट्टीचे समर्थन
By Admin | Updated: November 25, 2015 23:44 IST2015-11-25T23:44:25+5:302015-11-25T23:44:25+5:30
खेळपट्टी निकाल देणारी असल्याचे सांगत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचे समर्थन केले

संजय बांगरकडून खेळपट्टीचे समर्थन
नागपूर : खेळपट्टी निकाल देणारी असल्याचे सांगत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचे समर्थन केले. बुधवारपासून प्रारंभ झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डाव २१५ धावांत संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पाहुण्या संघाची २ बाद ११ अशी अवस्था झाली आहे.
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बांगर म्हणाले,‘ही निकाल देणारी खेळपट्टी असून यावर खेळण्याचे उभय संघांपुढे समान आव्हान आहे. जो संघ या खेळपट्टीसोबत जुळवून घेण्यात यशस्वी ठरेल, त्या संघाला विजयाची संधी राहील.’
सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण खेळपट्टी आव्हानात्मक असेल तर फटक्यांची निवड करताना चूक होण्याची शक्यता असते. हा खेळाचा एक भाग आहे. पाहुण्या संघांना भारतीय उपखंडात अशा खेळपट्ट्यांची अपेक्षा असायला हवी, असेही बांगर म्हणाले.
भारतीय संघ विदेश दौऱ्यावर असतो त्यावेळी चेंडू पहिल्या षटकापासून स्विंग होतो. त्यामुळे उपखंडाचा दौरा करणाऱ्या संघानी येथे फिरकीला अनुकूल खेळपट्टी मिळाली तर त्याची तक्रार करायला नको. उभय संघांसाठी खेळपट्टी सारखीच आहे. फिरकीला खेळण्याचे तंत्र अवगत असणे महत्त्वाचे आहे. या खेळपट्टीवर धावा फटकावणे कठीण आहे. या मालिकेत विशेष धावा फटकावल्या गेलेल्या नाहीत, हे स्वीकारावेच लागेल, असेही बांगर म्हणाले.
बांगर यांनी ३२ धावांची खेळी करणारा यष्टिरक्षक वृद्धिमान साहाची प्रशंसा केली तर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माची पाठराखण केली. (क्रीडा प्रतिनिधी)