‘आयपीएल’मुळे पीटरसन बिथरला : हुसेन
By Admin | Updated: October 11, 2014 04:38 IST2014-10-11T04:38:36+5:302014-10-11T04:38:36+5:30
भारतात इंडियन प्रीमियर लीग खेळायला लागल्यानंतर केव्हिन पीटरसन हा संघापेक्षा स्वत:ला मोठा समजू लागला. अन्य खेळाडूंना माझ्या कमाईचा हेवा वाटतो
_ns.jpg)
‘आयपीएल’मुळे पीटरसन बिथरला : हुसेन
लंडन : भारतात इंडियन प्रीमियर लीग खेळायला लागल्यानंतर केव्हिन पीटरसन हा संघापेक्षा स्वत:ला मोठा समजू लागला. अन्य खेळाडूंना माझ्या कमाईचा हेवा वाटतो, असे वारे त्याच्या डोक्यात शिरू लागले होते. ‘आयपीएल’मुळेच पीटरसनचे डोके खराब झाल्याची टीका इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने केली.
स्वत:च्या आत्मचरित्रात सहकारी आणि कोचवर चिखलफेक करणाऱ्या पीटरसनने अनेक धक्कादायक खुलासे करताना अनेकांवर शरसंधान साधताना इंग्लिश क्रिकेटची हानी केली, असे हुसेनचे मत आहे. वृत्तपत्रातील स्तंभात हुसेन म्हणतो, ‘आयपीएल खेळल्यापासून पीटरसनची मन:स्थिती बदलली. पैशाची नशा त्याच्या डोक्यात भिनली आणि संघापेक्षा तो स्वत:ला मोठा मानू लागला. सहकाऱ्यांना तो तुच्छ समजत होता. आत्मचरित्रात हीच अरेरावी कथन केली आहे. इंग्लंड संघातील सर्वांत यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या पीटरसनला आयपीएलने खराब करून टाकले.’
इंग्लंड संघातून निलंबित करण्यात आलेल्या ‘केपी’ने आत्मचरित्रात कोच अॅण्डी फ्लॉवर यांच्यावर सडकून टीका केली. यावर हुसेन म्हणतो, ‘फ्लॉवर यांनी पीटरसनला योग्य वळणावर आणण्यासाठी आठोकाठ प्रयत्न केले. निकाल संघाच्या विरोधात जात असताना देखील हा स्टार खेळाडू अनेकांना तुच्छ समजत होता. जेव्हा पाणी डोक्यावरून जाऊ लागले तेव्हा मात्र केपीसाठी सर्वच जण चुकीचे असू शकत नाहीत, अशी फ्लॉवर यांना खात्री पटली होती.
जगातील सर्वाधिक बोलणारा समालोचक असलेल्या हुसेनने अपेक्षा वर्तविली की ‘‘पीटरसन एक ना एक दिवस इतरांना चुकीचे ठरविणे सोडून स्वत:च्या चुकांचे आत्मपरीक्षण नक्की करेल. त्याला चुकांचा पश्चात्ताप होईल आणि मी असा का वागलो, हे पटायला लागेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.’’ (वृत्तसंस्था)