फिलँडर मालिकेतून ‘आऊट’
By Admin | Updated: November 12, 2015 23:28 IST2015-11-12T23:28:39+5:302015-11-12T23:28:39+5:30
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वर्नोन फिलँडरला टाचेच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली.

फिलँडर मालिकेतून ‘आऊट’
बेंगळुरू : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वर्नोन फिलँडरला टाचेच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली. फिलँडरच्या स्थानी केली अॅबोटची संघात निवड करण्यात आली असून तो शुक्रवारी संघासोबत जुळणार आहे, असे दक्षिण आफ्रिका संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले.
भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला धक्का बसला आहे. शनिवारपासून बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अष्टपैलू वर्नोन फिलँडर दुखापतग्रस्त झाला आहे. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सरावादरम्यान वेगवान गोलंदाज फिलँडरच्या डाव्या टाचेला दुखापत झाली आहे. सरावादरम्यान फिलँडरचा पाय फलंदाज डीन एल्गरच्या पायावर पडला. त्यामुळे त्याचा डावा पाय मुरगळला. फिलँडरला रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅनच्या अहवालानंतरच त्याला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
दिग्गज फलंदाज डिव्हिलियर्स म्हणाला,‘ही दु:खद बाब आहे. ’
फिलँडर दुखापतग्रस्त झाल्यामुळे वेगवान गोलंदाजीच्या विभागात दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. डेल स्टेन पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही, तर मोर्ने मोर्कल अद्याप पूर्णपणे फिट नाही. (वृत्तसंस्था)