फिक्सिंग व भ्रष्टाचारामुळे आयपीएलमधून पेप्सीचे वॉकआऊट ?
By Admin | Updated: October 9, 2015 14:53 IST2015-10-09T14:53:28+5:302015-10-09T14:53:52+5:30
आयपीएलचे प्रायोजक पेप्सी पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
फिक्सिंग व भ्रष्टाचारामुळे आयपीएलमधून पेप्सीचे वॉकआऊट ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - भ्रष्टाचार व फिक्सिंगच्या आरोपांचा सामना करणा-या इंडियन प्रीमियर लीगच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आयपीएलचे मुख्य प्रायोजक पेप्सीने पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पेप्सीने बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे.
पेप्सीने २०१३ ते २०१७ या कालावधीसाठी आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले होते. यासाठी पेप्सीने तब्बल ३९६ कोटी रुपयेही मोजले होते. मात्र गेल्या दोन हंगामांपासून आयपीएलमध्ये फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत असल्याने आता पेप्सीने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकऱणांमुळे आयपीएलची प्रतिमा डागाळली आहे अशी पेप्सीने नोटीसमध्ये म्हटले आहे. पेप्सीने आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांना आयपीएल २०१६ च्या हंगामाचे प्रायोजकत्व सोडत असल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. रमण यांनी या संदर्भात बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी चर्चादेखील केल्याचे समजते.
पेप्सीने गेल्याच हंगामात आयपीएलमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती. मात्र त्यावेळी बीसीसीआयने पेप्सीच्या अधिका-यांसोबत चर्चा करुन त्यांना रोखले होते. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी टाकल्याने आधीपासूनच यंदाचा आयपीएलच्या हंगामाबाबत गोंधळाची स्थिती आहे. १८ ऑक्टोबररोजी मुंबईत बीसीसीआयची बैठक होणार असून या बैठकीत पेप्सीच्या नोटीसवर चर्चा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.