पाटील स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज
By Admin | Updated: March 26, 2017 00:50 IST2017-03-26T00:50:24+5:302017-03-26T00:50:24+5:30
फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील

पाटील स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज
मुंबई : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर करण्यात आली आहे. देशातील दर्जेदार स्टेडियमपैकी पाटील स्टेडियम हे एक असून विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचा विश्वास फिफा स्पर्धाप्रमुख जैमे यार्जा यांनी व्यक्त केला.
फिफाच्या शिष्टमंडळाने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमची शनिवारी पाहणी केली, त्या वेळी जैमे यार्जा बोलत होते. या प्रसंगी फिफा स्पर्धा संचालक झेविअर सेप्पी, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनेझेझ, स्टेडिअमचे अध्यक्ष विजय पाटील, नवी मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते.
खेळाडूंसाठी नव्याने तयार करण्यात आलेले ड्रेसिंग रूम, प्रेक्षक आसनव्यवस्था, सामना संपल्यानंतर प्रेक्षकांना बाहेर पडण्याची व्यवस्था या बाबींची फिफा शिष्टमंडळाने पाहणी केली. या वेळी यार्जा म्हणाले, की पाटील स्टेडियमला यंदाची ही चौथी भेट असून स्टेडियम पाहून मी आनंदी आहे. या स्टेडियमसारखा दर्जा अन्य स्टेडियमने राखणे गरजेचे आहे. शिवाय, विश्वचषकासाठी येणाऱ्या संघांसाठी ४ ट्रेनिंग मैदानाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. या विश्वचषकामुळे भारतीय फुटबॉलचा चेहरा बदलेल, अशी आशा यार्जा यांनी व्यक्त केली. (क्रीडा प्रतिनिधी)