आरसीबीला ‘पठाणी’ दणका
By Admin | Updated: May 3, 2016 03:56 IST2016-05-03T03:56:58+5:302016-05-03T03:56:58+5:30
युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ५ विकेटनी विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स

आरसीबीला ‘पठाणी’ दणका
बंगळुरू : युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ५ विकेटनी विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (आरसीबी) हातातून सामना अक्षरश: हिसकावून घेतला. आरसीबीने दिलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना केकेआरने १९.१ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १८९ धावा काढल्या.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून केकेआरने आरसीबीला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. लोकेश राहुल व कर्णधार विराट कोहली यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने ७ बाद १८५ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा
डाव ११व्या षटकात ४ बाद ६९,
असा घसरला. कर्णधार गौतम
गंभीर २९ चेंडूंत ३७ धावा काढून
बाद झाल्यानंतर आरसीबी
बाजी मारणार, असेच चित्र होते.
मात्र, रसेल व पठाण यांनी आपला दांडपट्टा फिरवून सामन्याचे चित्र पालटले.
रसेलने २४ चेंडूंत १ चौकार व ४ उत्तुंग षटकारांच्या साह्याने ३९ धावा कुटल्या. तर, पठाणने निर्णायक नाबाद अर्धशतक झळकावताना केवळ २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा फटकावल्या. यजुवेंद्र
चहलने टिच्चून मारा करताना २ बळी घेऊन केकेआरला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी, राहुल व कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने आव्हानात्मक मजल मारली. विध्वंसक ख्रिस गेल पुन्हा फेल ठरल्यानंतर या दोघांनी ८४ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. राहुलने ३२ चेंडंूत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा फटकावल्या. राहुलनंतर आलेला एबीही केवळ ४ धावा काढून परतला. कोहली ४४ चेंडूंत ४ चौकारांसह ५२ धावा काढून बाद झाला. तर, वॉटसनने २१ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३४ धावा काढल्या.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ७ बाद १८५ धावा (लोकेश राहुल ५२, विराट कोहली ५२, शेन वॉटसन ३४; मॉर्नी मॉर्केल २/२८, पीयूष चावला २/३२) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.१ षटकांत ५ बाद १८९ धावा (युसूफ पठाण नाबाद ६०, आंद्रे रसेल ३९, गौतम गंभीर ३७; यजुवेंद्र चहल २/२७).