पॅरालिम्पिक समिती निलंबित
By Admin | Updated: April 23, 2015 02:36 IST2015-04-23T02:36:18+5:302015-04-23T02:36:18+5:30
१५व्या राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेच्या वेळी खेळाडूंच्या अव्यवस्थेवरून ही कारवाई करण्यात आली. पीसीआयची मान्यता तत्काळ प्रभावाने निलंबित

पॅरालिम्पिक समिती निलंबित
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्या निलंबनाच्या कारवाईपाठोपाठ केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेदेखील भारतीय पॅरालिम्पिक समितीवर (पीसीआय) निलंबनाचा बडगा आणला. मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये झालेल्या १५व्या राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेच्या वेळी खेळाडूंच्या अव्यवस्थेवरून ही कारवाई करण्यात आली.
पीसीआयची मान्यता तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली असून ही कारवाई पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची हेळसांड होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर मंत्रालयाने साईला
सर्व आरोपांच्या चौकशीचे निर्देश
दिले होते. साईने केलेल्या
चौकशीत सर्व आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे. पीसीआयने स्वत:च्या आणि सरकारच्या नियमांचे
उल्लंघन केल्याचे मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.
सरकारचे मत असे, की पीसीआय अपंग खेळाडूंचे हित जोपासणारे काम करण्यात अपयशी ठरले आहे. याच कामांसाठी पीसीआयला मान्यता देण्यात आली होती. पीसीआयविरुद्ध पॅरा खेळाडूंमध्येदेखील क्षोभ आहे. मंत्रालयाने याआधी पीसीआयवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
पीसीआयला पॅरा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून नोव्हेंबर २०११ मध्ये परवानगी बहाल करण्यात आली होती. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीला अस्थायी समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे. पीसीआयला मान्यता बहाल होईपर्यंत भारतातील अपंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघनिवड ही समिती करेल.
आंतरराष्ट्रीय संघटनेने भारतीय क्रीडा प्राधिकरणाला तशी परवानगी दिल्यास साईद्वारे पॅरा खेळांचे संचालन होऊ शकेल, असेही मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेने १५ एप्रिल रोजी पीसीआयला निलंबित केले होते. दरम्यान, पीसीआयचे अंतरिम अध्यक्ष नंदकिशोर नाले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
(वृत्तसंस्था)