मलिकच्या शतकाने पाकची झिम्बाब्वेवर मात
By Admin | Updated: May 28, 2015 01:34 IST2015-05-28T01:34:09+5:302015-05-28T01:34:09+5:30
शोएब मलिकच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ४१ धावांनी पराभव करताना तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.

मलिकच्या शतकाने पाकची झिम्बाब्वेवर मात
लाहोर : शोएब मलिकच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ४१ धावांनी पराभव करताना तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.
मलिकने अवघ्या ७६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. त्याचे हे सहा वर्षांनंतरचे पहिले शतक ठरले. याशिवाय हॅरीस सोहेलने नाबाद ८९, मोहम्मद हाफीजने ८६ आणि कर्णधार अजहर अलीने ७९ धावा केल्या. या बळावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३७५, अशी विशाल धावसंख्या गाठली.
त्याआधी टी-२0 मालिकेत दोन्ही सामन्यांत निसटता पराभव पत्करावा लागणाऱ्या झिम्बाब्वेने पुन्हा पाकिस्तानला सहज विजय मिळवू दिला नाही. कर्णधार चिगुंबुराने ९५ चेंडूंत १0 चौकार आणि चार षटकारांसह ११७ धावा केल्या; परंतु अखेरच्या क्षणी आवश्यक धावगती राखण्याच्या प्रयत्नात संघ दबावात आला. त्यामुळे झिम्माब्वे निर्धारित ५0 षटकांत ५ बाद ३३४ धावा करू शकला.
चिगुंबुराशिवाय हॅमिल्टन मास्कदाजाने ७३ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली. याशिवाय चिगुंबुराने सीन विलियम्सच्या (३६) साथीने चौथ्या गड्यासाठी ७४ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून वहाब रियाजने ४७ धावांत ३ गडी बाद केले. झिम्बाब्वेने सामना गमावला असला तरी त्यांनी क्रिकेट चाहत्यांची मने जिंकण्यात मात्र यश मिळविले. याशिवाय त्यांनी पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्याही उभारली.
त्यांनी बुलावायो येथे २00२मध्ये ९ बाद २९५ धावा केल्या होत्या. चिगुंबुराने वन-डेतील त्याचे पहिले शतक ठोकले. याआधी त्याची सर्वोत्तम खेळी ही ९0 धावांची होती, जी त्याने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुलावायो येथे केली होती. दुसरा एकदिवसीय सामनादेखील गद्दाफी स्टेडियममध्ये शुक्रवारी खेळवला जाणार आहे, तर तिसरा सामना रविवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान ५0 षटकांत ३ बाद ३७५. (शोएब मलिक ११२, सोहेल ८९, हाफीज ८६, अजहर अली ७९, उत्सेया २/६३). झिम्बाब्वे : ५0 षटकांत ५ बाद ३३४. चिगुंबुरा ११७, मसकदाझा ७३, वहाब रियाज ३/४७).(वृत्तसंस्था)
पाकिस्तान भूमीवरील भारताचा विक्रम तुटला
लाहोर : भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान भूमीवर केलेला सर्वाधिक धावांचा ७ वर्षांपूर्वीचा विक्रम पाकिस्तानने तोडला.
पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध ३ बाद ३७५ धावा केल्या. ही पाकिस्तान भूमीवरील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्याआधीचा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने २00८ मध्ये एशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध कराचीत ४ बाद ३७४ धावा ठोकल्या होत्या.
पाकची याआधी त्यांच्या भूमीवरील सर्वोत्तम धावसंख्या ६ बाद ३५३ अशी होती. ती त्यांनी इंग्लंडविरुद्ध २00५ मध्ये कराचीत नोंदवली होती. पाकच्या डावादरम्यान त्यांच्या चार आघाडीच्या फलंदाजांनी ७0 पेक्षा जास्त धावा केल्या. मोहम्मद हाफीजने ८६, अजहर अलीने ७९, शोएब मलिकने ११२ आणि हारीस सोहेलने नाबाद ८९ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात पहिल्या चार फलंदाजांनी ७0 पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसे पाहता एकाच डावात चार फलंदाजांनी ५0 पेक्षा जास्त धावा करण्याचा वनडेतील हा एकूण ५0 वा क्षण आहे.