ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 8 - अलीकडच्या काळातील पाकिस्तानचा सर्वोत्तम क्रिकेटपटू युनूस खानने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी वेस्ट इंडिज दौरा युनूसच्या क्रिकेट करीयरमधील शेवटची मालिका असेल. दोनवर्षापूर्वी 2015 मध्ये युनूस खानने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. युनूस खान एकमेव पाकिस्तानी क्रिकेटपटू ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
युनूसला 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 23 धावांची आवश्यकता आहे. जगातील 11 देशांमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. निवृत्ती जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना युनूस म्हणाला की, माझ्यावर निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी दबाव होता. मी निवृत्ती घेऊ नये असे मला अनेकांनी सांगितले होते. पण हीच वेळ निवृत्ती घेण्यासाठी योग्य आहे असे मला वाटते. निवृत्ती घेतली म्हणून मी क्रिकेटपासून दूर जातोय असे समजू नका. मी काही चूक केली असेल तर मी माफी मागतो असे युनूसने सांगितले.
2007 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा अचानक झालेला मृत्यू क्रिकेट करीयरमधील सर्वात दु:खद घटना होती असे युनूसने सांगितले. युनूसच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने 2009 मध्ये टी-20 वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.