पाकची आयर्लंडविरुद्ध ‘करा किंवा मरा’ लढत
By Admin | Updated: March 14, 2015 23:01 IST2015-03-14T23:01:29+5:302015-03-14T23:01:29+5:30
चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या पाकिस्तान संघाला उद्या रविवारी आयर्लंडविरुद्ध विजय हवा असल्याने ही लढत त्यांच्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी असेल.

पाकची आयर्लंडविरुद्ध ‘करा किंवा मरा’ लढत
अॅडलेड : चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या पाकिस्तान संघाला उद्या रविवारी आयर्लंडविरुद्ध विजय हवा असल्याने ही लढत त्यांच्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी असेल. साखळीतील हा अखेरचा सामना जिंकणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये धडक देईल; तर पराभूत संघाची धाव सरासरीच्या आधारे वेस्ट इंडिजशी तुलना होणार आहे. गतचॅम्पियन भारत आणि द. आफ्रिका क्रमश: पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. यजमान आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगला देश हे संघ अ गटातून क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाले. २००७ च्या विश्वचषकात पाक-आयर्लंड सामन्याच्यावेळी पाकचे कोच बॉब वूल्मर हे हॉटेलच्या खोलीत संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले होते. आयर्लंडने पाकला पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर ढकलले होते.
त्यानंतर उभय संघ परस्परांविरुद्ध चार सामने खेळले. पाकने तीन सामने जिंकले तर एक सामना ‘टाय’ झाला.
सध्याच्या स्पर्धेत दोन्ही संघांनी पाचपैकी तीन सामने जिंकून सहा गुणांची कमाई केली. पाकला पहिल्या सामन्यात भारताने आणि नंतर विंडीजने नमविले. त्यानंतर मिस्बाहच्या नेतृत्वाखालील या संघाने झिम्बाब्वे, यूएई आणि द. आफ्रिकेवर विजय साजरे केले. दुसरीकडे आयर्लंडने पहिल्याच सामन्यात विंडीजचे ३०५ धावांचे लक्ष्य गाठून धोबीपछाड दिली. पाठोपाठ यूएई आणि झिम्बाब्वेलाही नमविले. पण हा संघ भारत आणि द. आफ्रिकेकडून पराभूत झाला. पाककडून मिस्बाहचा अपवाद वगळता अन्य कोणताही फलंदाज ५० वर धावा काढू शकला नाही. २५० वर धावा काढण्यात या संघाला केवळ यूएईविरुद्ध यश आले होते. पाकचे फलंदाजी कोच ग्रांट फ्लॉवर म्हणाले, ‘‘फलंदाजांनी धावा काढायला हव्या. फलंदाजीची मोठी क्षमता संघात आहे. वेगवान मारादेखील उत्तम आहे.’’
(वृत्तसंस्था)
अशी आहेत ब गटातील जर-तरची समीकरणे-
च्भारताने पहिले आणि दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान मिळवून बाद फेरी गाठली आहे.
च्बाद फेरीतील तिसरा आणि चौथा संघ कोण असेल याचे उत्तर आजच्या दोन सामन्यातून मिळणार आहे. पाकिस्तान, आयर्लंड आणि वेस्ट इंडीज यापैकी कोणतेही दोन संघ बाद फेरीत जावू शकतो.
च्पाक आणि आयर्लंडचेही प्रत्येकी सहा गुण आहेत. दोन्हीपैकी जिंकणारा संघ आठ गुणांसह बाद फेरीत जाईल.
च्विंडीजविरुध्द युएई संघ जिंकल्यास त्यांचेही सहा गुण होतील, त्यामुळे पाक आणि आयर्लंड यांच्यातील पराभूत संघाबरोबर त्याचे समान ६ गुण होतील. यावेळी दोन्हीपैकी सरस धावगती असलेला संघ बाद फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र ठरेल.
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहजाद, एहसान अदील, हॅरिस सोहेल, मोहम्मद हाफिज, मोहम्मद इरफान, नासिर जमशेद, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहिद आफ्रिदी, शोएब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल (यष्टीरक्षक), वहाब रिआज, यासीर शाह, युनिस खान.
आयर्लंड : विलियम पोर्टेरफिल्ड (कर्णधार), अँडी बाल्ब्रीनी, पीटर चॅसे, अॅलेक्स कुसाक्स, जॉर्ज डॉक्रेल, एड जॉयसे, अँडी मॅकब्रीन, जॉन मूनी, केवीन ओब्राइन, नेल ओब्राइन (यष्टीरक्षक), मॅक्स सोरेन्सेन, पॉल स्टीर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन (यष्टीरक्षक), क्रेग यंग.