पाकिस्तानची आज अग्निपरीक्षा
By Admin | Updated: March 22, 2016 02:49 IST2016-03-22T02:49:53+5:302016-03-22T02:49:53+5:30
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून झालेल्या पराभवानंतर टीकेचे लक्ष्य ठरत असलेल्या पाकिस्तान संघापुढे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी बलाढ्य न्यूझीलंडशी मंगळवारी दोन हात

पाकिस्तानची आज अग्निपरीक्षा
मोहाली : पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून झालेल्या पराभवानंतर टीकेचे लक्ष्य ठरत असलेल्या पाकिस्तान संघापुढे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी बलाढ्य न्यूझीलंडशी मंगळवारी दोन हात करण्याचे आव्हान असेल. सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या किवी संघाला नमवणे कठीण असल्याची जाणीव असल्याने पाकिस्तानपुढे मोठ्या अडचणी आहेत.
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. लढवय्या बांगलादेशाला नमवून विजयी सलामी दिल्यानंतर पाक संघाला यजमान भारताकडून मात खावी लागली. दबावाखाली खालावणारी कामगिरी पाकसाठी मोठी अडचण आहे. विशेष म्हणजे, किवींविरुद्ध पराभूत झाल्याचे पाकचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यासारखे होईल. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ असाच आहे. दोन्ही संघांची गोलंदाजी मजबूत असल्याने या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन करणाऱ्या मोहंमद आमिरवर पाकची गोलंदाजी अवलंबून आहे. त्याचबरोबर, मोहंमद इरफान, मोहंमद सामी, इमाद वसीम,
वहाब रियाज आणि शाहीद अफ्रिदी-शोएब मलिक या अष्टपैलू फिरकीपटूंवरही पाकच्या गोलंदाजीची जबाबदारी आहे. (वृत्तसंस्था)
> हेड टू हेड
या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत १४ सामने झाले आहेत. यामध्ये न्युझीलंड संघाने ६ तर पाकिस्तान संघाने ८ सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे.
सामन्याची वेळ सायंकाळी ७. ३० स्थळ :
पीसीए स्टेडियम, मोहाली
याआधी आम्ही भलेही दोन बलाढ्य संघांना नमवण्यात यशस्वी ठरलो असलो, तरी खूप पुढचा विचार करीत नाही. पाक संघ कोणत्याही वेळेला चमकदार कामगिरी करण्यास सक्षम आहे. आम्ही आतापर्यंत चांगला खेळ केला आहे; मात्र त्यामुळे प्रत्येक सामन्यात चांगला खेळ होईल, याची हमी देता येणार नाही. त्यामुळेच चांगला सराव करून सर्वोत्तम खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- माईक हैसन,
प्रशिक्षक - न्यूझीलंड
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), हेन्री निकोलस, ल्यूक राँची, रॉस टेलर, कॉलिन मुन्रो, मिशेल सँटनर, नॅथन मॅक्युलम, ग्रँट इलियट, मिशेल मॅक्लेनघन, टीम साउदी, टे्रंट बोल्ट, अॅडम मिल्ने, ईश सोधी व कोरी अँडरसन.
पाकिस्तान : शाहीद आफ्रिदी (कर्णधार), मोहंमद हाफीज, शोएब मलिक, मोहंमद इरफान, शारजील खान, मोहंमद नवाझ, मोहंमद सामी, खालीद लतीफ, मोहंमद आमिर, उमर अकमल, सर्फराज अहमद, इमाद वसीम, अन्वर अली व खुर्रम मन्सूर.
> पाकला स्थानिक क्रिकेट सुधारावे लागेल
भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तान संघाला मायदेशात कशा प्रकारच्या प्रतिक्रियेला सामोरे जावे लागत असेल, याची मला कल्पना आहे. मीडिया व चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा अंदाज लावणे कठीण नाही. कर्णधारपदाबाबत चर्वितचर्वण सुरू आहे. पाक संघाने कामगिरीत सातत्य राखले असते किंवा निवड समितीच्या निर्णयात सातत्य असते तर अशा प्रकारच्या प्रतिक्रियेला सामोरे जावे लागले नसते. पाक संघाला भारताविरुद्धचा पराभव विसरून आगेकूच करावी लागणार आहे. सामन्याबाबत चर्चा करताना महत्त्वाचा मुद्दा उमर अकमल हासुद्धा आहे. त्याला आपल्या फलंदाजी क्रमाबाबत चर्चा करण्यासाठी कुणाकडे जाण्याची गरज नाही. त्याच्या फलंदाजी क्रमाबाबतचा निर्णय सर्वस्वी संघव्यवस्थापनाचा आहे. ते त्याच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने याबाबत प्रत्येकाकडे तक्रार करणे थांबवायला हवे. कुठलीही बाब कुणा एका खेळाडूची नसून संघाची असते, हे त्याने लक्षात घ्यायला हवे.
उर्वरित दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवला तर पाक संघाबाबतची नाराजी दूर होईल. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ निश्चितच उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल. संघ विजयी ठरला तर सर्व काही विसरता येते. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे सोपे नाही. मोहालीमध्ये तर हे अधिक कठीण काम आहे. पाकिस्तानकडे आता गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये पाक संघ नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. पाक संघाला पराभव स्वीकारावा लागला तर टीकेचा सूर आणखी तीव्र होईल.
गेल्या काही वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध पाकची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. न्यूझीलंड संघात आता ब्रँडन मॅक्युलमही नाही. पाकिस्तान संघाला आशा कायम राखत सकारात्मक खेळ करावा लागेल. पाकने फिरकीचा पर्याय म्हणून इमाद वसीमला संघात स्थान द्यायला हवे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जण आफ्रिदीविरुद्ध बोलत आहे. भारतीय उपखंडात आमची विचारप्रणाली अशाच पद्धतीची असते. यासाठी आम्हाला पश्चिमेकडील देशांकडून शिकणे आवश्यक आहे. तेथे याचा केवळ एक खेळ म्हणून विचार केला जातो. आम्ही मात्र याचा खोलवर विचार करतो. आम्ही भविष्याबाबत विचार करीत नाही. पाक संघाच्या कामगिरीत सातत्य का नाही आणि गेल्या तीन वर्षांत टीम इंडियाकडून का पराभव स्वीकारावा लागत आहे, याबाबत कुणी चर्चा करणार नाही. खरा प्रश्न आमच्या प्रथम श्रेणी क्रिकेटचा आहे. आमच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कुणी तंत्रावर लक्ष पुरवत नाही किंवा क्षेत्ररक्षण व फिटनेसचाही विचार करीत नाही. पाकने जर यावर लक्ष केंद्रित केले नाही तर कर्णधार व प्रशिक्षकांना अधिक प्रश्न विचारले जातील. प्रशिक्षकाची भूमिका बजावत असलेला माझा जुना सहकारी वकारला दडपण हे या भूमिकेचा महत्त्वाचा भाग असल्याची चांगली कल्पना आहे. बांगलादेशचा गोलंदाज तस्कीन अहमदला स्पर्धेदरम्यान निलंबित करायला नको होते, असे मत व्यक्त करणाऱ्या इयान चॅपेल यांच्या मताशी मी सहमत आहे. आयसीसीला स्पर्धा संपण्याची प्रतीक्षा करता आली असती. असे जर होते तर आशिया कप स्पर्धेत पंच काय करीत होते. त्या वेळी कुणी त्याच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप नोंदवला नाही. तस्कीन बांगलादेशचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याचे निलंबन म्हणजे संघासोबत अन्याय झाला आहे. (टीसीएम)