पाकिस्तानची भिस्त फलंदाजांवर
By Admin | Updated: August 3, 2016 04:19 IST2016-08-03T04:19:38+5:302016-08-03T04:19:38+5:30
पाकिस्तान संघाची इंग्लंडविरुद्ध प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भिस्त ही फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.

पाकिस्तानची भिस्त फलंदाजांवर
बर्मिंघम : लॉर्डस्वर शानदार विजय मिळवल्यानंतर ओल्ड ट्रॅफर्डवर दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाची इंग्लंडविरुद्ध प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भिस्त ही फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.
उभय संघांदरम्यान आज, बुधवारपासून एजबेस्टनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात ३३० धावांनी विजय मिळवत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्याआधी, पाकने लॉर्डस्मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ७५ धावांनी विजय मिळवला होता.
फलंदाजांचे अपयश पाक संघासाठी चिंतेचा विषय आहे. पहिल्या लढतीत कर्णधार मिसबाह-उल-हकचे शतक उभय संघात फरक स्पष्ट करणारे ठरले, पण दुसऱ्या लढतीत पाकच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही.
सलामीवीरांचे अपयश पाक संघासाठी चिंतेचा विषय ठरले आहे. कारण मोहम्मद हफीज व शॉन मसूद संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले आहे. मसूदला तिसऱ्या लढतीत वगळण्याची शक्यता आहे. त्याच्या स्थानी समी असलमला संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत अझहर अलीला सलामीवीराची भूमिका बजवावी लागेल. (वृत्तसंस्था)