पाकने मालिका जिंकली
By Admin | Updated: May 31, 2015 01:32 IST2015-05-31T01:32:21+5:302015-05-31T01:32:21+5:30
: कर्णधार अजहर अलीच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात येथे झिम्बाब्वेचा ६ गडी राखून पराभव करताना १७ महिन्यानंतर पहिली वन-डे मालिका जिंकली.

पाकने मालिका जिंकली
लाहोर : कर्णधार अजहर अलीच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात येथे झिम्बाब्वेचा ६ गडी राखून पराभव करताना १७ महिन्यानंतर पहिली वन-डे मालिका जिंकली.
अलीने त्याचे दुसरे वन-डे शतक ठोकताना १०४ चेंडूंत १०२ धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने गद्दाफी स्टेडियमवर झिम्बाब्वेने दिलेले २६९ धावांचे लक्ष्य ४७.२ षटकांत पूर्ण केले आणि तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.
झिम्बाब्वेकडून पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सिकंदर रजा याने ८४ चेंडूंत ८ चौकार, ३ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. चामू चिभाभा यानेदेखील त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना ११ चौकार व एका षटकारासह ९९ धावांची खेळी केली. त्यामुळे त्यांचा संघ ७ बाद २६८ पर्यंत मजल मारूशकला.
पाकिस्तानने लाहोरमध्ये पहिला सामना ४१ धावांनी जिंकला होता आणि तिसरा आणि अखेरचा सामना याच मैदानावर रविवारी खेळवला जाणार आहे.
या मालिकेआधी पाकिस्तानने २ टी-२० सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती. त्याचबरोबर पाकिस्तानात ६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धाही झाली.
अलीने १०४ चेंडूंच्या खेळीत ८ चौकार मारले. त्याने त्याची सर्वोत्तम खेळीही केली. याआधी त्याने गेल्या महिन्यात ढाका येथे बांगलादेशविरुद्ध १०१ धावांची खेळी केली होती. अली बाद झाला तेव्हा पाकिस्तान विजयापासून ६० धावांनी दूर होता. अलीने सर्फराज अहमद (२२) याच्या साथीने सलामीसाठी ४६, असद शफिक (३९) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी ८५ व सोहेलबरोबर ५६ धावांची भागीदारी करताना संघाच्या विजयाचा पाया रचला.
त्यानंतर हारिस सोहेलने ४९ चेंडूंत ६ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. तसेच त्याने शोएब मलिक (२० चेंडूंत नाबाद ३६) याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ६० धावांची नाबाद भागदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.
त्याआधी रजाने शानदार खेळी केली. त्यामुळे झिम्बाब्वेने अखेरच्या ६ षटकांत ५९ धावांची भर त्यांच्या धावसंख्येत घातली. चिभाभा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ९९ धावांवर बाद होणारा पहिला झिम्बाब्वेचा खेळाडू ठरला. याआधी मॅल्कम वॉलेर, अॅलेस्टर कॅम्पबेल आणि अँडी फ्लॉवर यांनी ९९
धावा केल्या; परंतु हे तिघेही नाबाद राहिले होते. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
झिम्बाब्वे ५० षटकांत ७ बाद २६८. (सिकंदर रजा १००, चिभाभा ९९. वहाब रियाज २/५५, यासीर शाह २/४०).
पाकिस्तान : ४७.२ षटकांत ४ बाद २६९. (अझहर अली १०२, हारिस सोहेल नाबाद ५२, शोएब मलिक नाबाद ३६, असद शफिक ३९. ग्रॅमी क्रेमर २/५२).