दुबई : यष्टिरक्षक सर्फराज अहमद याच्या वादळी शतकी खेळाच्या बळावर पाकिस्तान संघाने पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४५४ धावांचा डोंगर उभारला. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सर्फराजने १०९ धावांची झुंझार खेळी केली. चहापानापर्यंत पाकिस्तानचा पहिला डाव संपुष्टात आला. पाकिस्तानची गेल्या २० वर्षांतील आॅस्ट्रेलियाविरुद्धची ही दुसरी मोठी धावसंख्या आहे. सर्फराजने आपले दुसरे कसोटी शतक झळकावताना १०५ चेंडूंत १४ चौकारांची फटकेबाजी केली. पाकने पहिल्या दिवशी ४ बाद २१९ धावांची मजल मारली होती. हा डाव आज पुढे खेळताना पाकने चौफेर फटकेबाजी केली. कर्णधार मिसबाह उल् हक ३४ आणि असद शफीक ९ धावांवर नाबाद होते. दोघांनी संघाला २९१ धावांपर्यंत पोहोचवले. मिसबाह १८२ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकार खेचून ६९ धावा करून माघारी परतला. मिसबाह आणि शफीक यांनी पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. शफीकने त्यानंतर सर्फराजसह सहाव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. शफीक ८९ धावांवर बाद झाला. त्याने १५१ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकार खेचले. त्यानंतर सर्फराजने वादळी खेळ करून अवघ्या ८० चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. धावफलकावर ४५४ धावा असताना तो बाद झाला. त्यानंतर याच धावसंख्येवर पाकचा डाव गुंडाळण्यात आॅसींना यश आले.