पाकिस्तानची इंग्लंडवर मात
By Admin | Updated: November 12, 2015 23:21 IST2015-11-12T23:21:58+5:302015-11-12T23:21:58+5:30
मोहंमद इरफान, शोएब मलिक आणि अन्वर अली यांच्या शानदार गोलंदाजीपाठोपाठ मोहम्मद हफिजच्या नाबाद शतकाच्या बळावर पाकिस्तानने इंग्लंडला

पाकिस्तानची इंग्लंडवर मात
अबुधाबी : मोहंमद इरफान, शोएब मलिक आणि अन्वर अली यांच्या शानदार गोलंदाजीपाठोपाठ मोहम्मद हफिजच्या नाबाद शतकाच्या बळावर पाकिस्तानने इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सहा गड्यांनी पराभूत करीत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी संपादन केली.
पाकपुढे २१७ धावांचे लक्ष्य होते. हफिजने दहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०२ धावा ठोकल्या.
शोएब मलिकसोबत(२६) त्याने ७० आणि आझमसोबत(नाबाद ६२)पाचव्या गड्यासाठी १०६ धावांची नाबाद भागीदारी करीत पाकला ४३.४ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवून दिला.
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले; परंतु त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला आणि त्यांची पहिल्या ४ षटकांतच ३ बाद १४ अशी स्थिती केली; परंतु त्यानंतर इयॉन मॉर्गन आणि जेम्स टेलर यांनी चौथ्या गड्यासाठी २७.२ षटकांत १३३ धावांची भागीदारी करताना इंग्लंड संघाची पडझड थांबवली; परंतु शोएब मलिकने मॉर्गनला सर्फराज अहमदकरवी झेलबाद करीत ही जोडी फोडली आणि त्यानंतर इंग्लंडकडून मोठी भागीदारी होऊ शकली नाही व अखेर त्यांचा संघ ४९.४ षटकांत २१६ धावांत सर्वबाद झाला.
इंग्लंडकडून इयॉन मॉर्गन याने ९६ चेंडूत ११ चौकारांसह ७६ आणि जेम्स टेलरने ८२ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ६० धावांचे योगदान दिले.
पाकिस्तानकडून मोहंमद इरफान सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३५ धावांत ३ गडी बाद केले. त्याला अन्वर अली आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत सुरेख साथ दिली.(वृत्तसंस्था)