भारताकडून पाकचा धुव्वा
By Admin | Updated: October 16, 2014 01:31 IST2014-10-16T01:31:56+5:302014-10-16T01:31:56+5:30
कर्णधार अरमान कुरैशीसह (२ गोल) संघातील इतर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा ६-० असा धुव्वा उडविला़

भारताकडून पाकचा धुव्वा
जोहोर बाहरू : कर्णधार अरमान कुरैशीसह (२ गोल) संघातील इतर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा ६-० असा धुव्वा उडविला़
२१ वर्षांखालील गटात आयोजित स्पर्धेच्या गत सामन्यात ब्रिटनकडून ०-२ ने पराभूत झालेल्या भारतीय संघाने आज प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली आणि पाकवर एकतर्फी विजय मिळविला़ भारताकडून आरमान कुरैशी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना (४९ आणि ७० वा मिनीट) शानदार गोल नोंदविले़ तर इमरान खान याने २१ व्या मिनिटाला, परविंदर सिंहने ३४, हरमनप्रीत सिंह ५३ आणि वरुणकुमार याने ६७ व्या मिनिटाला प्रत्येकी १ गोल नोंदवीत संघाला थाटात विजय मिळवून दिला़
भारताचा जोहोर चषक स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला आहे़ यापूर्वी भारताने न्यूझीलंडला पहिल्या लढतीत २-१ ने धूळ चारताना स्पर्धेत आगेकूच केली होती़ मात्र, दुसऱ्या लढतीत भारतावर ब्रिटनकडून ०-२ अशा फरकाने पराभवाची नामुष्की ओढावली होती़ स्पर्धेत आता भारतीय संघाचा पुढचा सामना गुरुवारी मलेशियाविरुद्ध होणार आहे़
पाकविरुद्धच्या लढतीत भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ सुरू केला़ भारताने फॉरवर्ड गोल करण्यासाठी आतुर असल्याचे दिसले़ त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव स्पष्टपणे दिसत होता़ टीम इंडियाने याचा लाभ घेतला़ सामन्याच्या २१ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर इमरान खान याने पहिला गोल नोंदवीत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली़
पाकिस्तानचा गोलकिपर मोहंमद खालीद याने पहिल्यांदा फ्लिकचा बचाव केला होता़ मात्र, इमरानच्या रिबाऊंडचे त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते़ परविंदरने पहिला हाफ संपायला अवघा १ मिनीट शिल्लक असताना गुरिंदर सिंहच्या अचूक पासवर शानदार गोल नोंदवून संघाची आघाडी २-० अशी करू न दिली़
सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्येही भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला़ मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही़ गोलकीपर अभिनव पांडे याने जबरदस्त खेळ करीत पाकचे अनेक हल्ले परतवून लावले़ दरम्यान, अरमान कुरैशीने ४९ व्या मिनिटाला नोंदवीत भारताची आघाडी ३-० अशी केली़ याच्या चार मिनिटानंतर हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर शानदार गोलमध्ये केले़ ६७ व्या मिनिटाला भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाले़ त्यावर वरुणने अप्रतिम गोल नोंदविला़ अरमान कुरैशी याने सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना गोल नोंदवून भारताचा मोठा विजय सुनिश्चित केला़ (वृत्तसंस्था)