मीरपूर : भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तान संघ आशिया कप टी-२० स्पर्धेत राऊंड रॉबिन लढतीत सोमवारी संयुक्त अरब अमिरातविरुद्ध विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पाकिस्तानची भिस्त चार वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. फलंदाजांचे अपयश यूएई संघासाठी चिंतेचा विषय आहे. कारण, श्रीलंका व बांगलादेश या संघांना अनुक्रमे १२९ व १३३ धावांत रोखल्यानंतरही या संघांविरुद्ध यूएई संघाला पराभव स्वीकारावा लागला. यूएई संघाला या दोन्ही लढतीत अनुक्रमे ११५ व ८२ धावा करता आल्या. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे आक्रमण मोहम्मद आमिर, मोहम्मद समी व वहाब रियाज सांभाळत आहे. हे गोलंदाज यूएई संघावर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत. या गोलंदाजांमध्ये सातत्याने १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यूएई संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. आमिर अॅण्ड कंपनीबाबत काही टिप्स ते आपल्या संघाला देऊ शकतात. पाकिस्ताविरुद्ध कडवी झुंज देण्यासाठी यूएई संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. (वृत्तसंस्था)
पाक-यूएई लढत आज
By admin | Updated: February 29, 2016 02:37 IST