पाक-बांगला कसोटी अनिर्णीत

By Admin | Updated: May 2, 2015 23:50 IST2015-05-02T23:50:22+5:302015-05-02T23:50:22+5:30

तमीम इकबालच्या विक्रमी द्विशतकाने बांगलादेशने आज येथे जबरदस्त पुनरागमन करताना आपल्या दुसऱ्या डावात विशाल धावसंख्या उभारली आणि

Pak-Bangla Test draw | पाक-बांगला कसोटी अनिर्णीत

पाक-बांगला कसोटी अनिर्णीत

खुलना : तमीम इकबालच्या विक्रमी द्विशतकाने बांगलादेशने आज येथे जबरदस्त पुनरागमन करताना आपल्या दुसऱ्या डावात विशाल धावसंख्या उभारली आणि पाकिस्तानच्या आशेवर पाणी फेरताना पहिला कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत सोडवला.
तमीमने २0६ धावा केल्या. बांगलादेशतर्फे ही सर्वोत्तम वैयक्तिक कसोटीतील खेळी ठरली.
तमीमने सलामीवीर इमरुल कायेस (१५0) याच्या साथीने पहिल्या गड्यासाठी ३१२ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशने सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी आज येथे ६ बाद ५५५ अशी धावसंख्या उभारताना पाकिस्तानविरुद्ध प्रथमच कसोटी सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवले. ही बांगलादेशची कसोटी सामन्यातील तिसरी मोठी आणि दुसऱ्या डावातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. बांगलादेशने दुसऱ्या डावात ५00 पेक्षा जास्त धावसंख्या उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बांगलादेशने पहिल्या डावात ३३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ६२८ धावा करीत २९६ धावांची मोठी आघाडी घेतली होती; परंतु तमीम आणि इमरुल यांनी बांगलादेशकडून सर्वात मोठी विक्रमी भागीदारी करताना त्यांच्या संघाचा पराभव टाळला. सामना अनिर्णीत ठेवण्याचा निर्णय झाला तेव्हा शाकिब अल हसन ७६ धावांवर खेळत होता.
पाकिस्तान कसोटीत बांगलादेशला पराभूत न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे. याआधी त्यांना तीन एकदिवसीय सामने आणि एकमेव टी २0 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. दुसरा आणि अंतिम कसोटी सामना ६ मेपासून ढाका येथे खेळवला जाणार आहे. तमीम आणि कायेस यांनी कालच्या बिनबाद २७३ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सकाळी जुल्फिकार बाबरच्या चेंडूवर कायेस सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला; परंतु तमीमने चिवट फलंदाजी केली आणि बांगलादेशकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम रचण्यात यश मिळवले. या डावखुऱ्या फलंदाजाने याआधीचा मुशफिकर रहीमचा विक्रम मोडला. रहीमने मार्च २0१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॅली येथे २00 धावा केल्या होत्या. तमीमने मोहंमद हाफिजच्या गोलंदाजीवर बाद होण्याआधी त्याच्या खेळीत २७८ चेंडूंचा सामना केला आणि १७ चौकार व ७ षटकार मारले. बांगलादेशने दुसऱ्या सत्रात त्याच्याशिवाय मोमिनुल हक (२१) याची विकेट गमावली. हक याला जुनैद खानने त्रिफळाबाद केले. त्यानंतर शाकीबने एक बाजू लावून धरताना पाकिस्तानच्या आशेवर पाणी फेरले.

Web Title: Pak-Bangla Test draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.