न्यूझीलंडविरुद्ध पेस खेळणार नाही
By Admin | Updated: June 13, 2015 00:53 IST2015-06-13T00:53:41+5:302015-06-13T00:53:41+5:30
पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यातून दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे

न्यूझीलंडविरुद्ध पेस खेळणार नाही
नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यातून दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. निवडकर्त्यांनी शुक्रवारी एकेरीचा स्टार खेळाडू सोमदेव देववर्मन आणि
यूकी भांबरी यांचा समावेश असलेल्या चार खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला.
गतवर्षी बंगळुरूयेथे झालेल्या जागतिक गटाच्या प्ले आॅफ सामन्यात सर्बियाविरुद्ध पेस खेळला होता. मात्र, त्या वेळी भारताला २-३ अशा पराभवास सामोरे जावे लागले होते. दरम्यान, पेसने माघार घेतल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दुहेरी गटाची जबाबदारी रोहन बोपन्ना आणि
साकेत माइनेनी यांच्यावर असेल. त्याच वेळी नवोदित गुणवान खेळाडू रामकुमार रामनाथन याचीदेखील राखीव खेळाडू म्हणून संघात वर्णी लागली आहे.
निवड समिती अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी पेसच्या माघारीबाबत सांगितले, की पेसने काही कारणास्तव न खेळण्याचा निर्णय घेतल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. ही एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा असून, या आधी दोन खेळाडूंची राखीव खेळाडू म्हणून संघात निवड केली होती, असेही मिश्रा यांनी सांगितले.
त्याच वेळी भारतीय प्रशिक्षक जीशान अली यांनी सांगितले, की पेसने माघार घेण्याबाबर नक्की कारण दिलेले नसले तरी, त्याने आगामी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी उपलब्ध असेल असे सांगितले आहे. दरम्यान, पेसच्या अनुपस्थितीत
संघाची मोठी कसोटी लागेल, तरी संघ मजबूत आहे, असेही अली यांनी सांगितले. भारतने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध ७ सामने खेळले असून, त्यापैकी ४ सामन्यांत बाजी मारली आहे. (वृत्तसंस्था)