अलेक्झांड्रासमोर पद्मिनी निष्प्रभ !

By Admin | Updated: October 15, 2014 04:24 IST2014-10-15T04:24:32+5:302014-10-15T04:24:32+5:30

अव्वल दर्जाचे खेळाडू महत्वाच्या लढतींत क्षणी आपली कामगिरी उंचावतात, याचे उदाहरण आज जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत अलेक्झांड्रा गोर्याचकिना हिच्या रुपात बघायला मिळाले.

Padmini was incomplete before Alexandra! | अलेक्झांड्रासमोर पद्मिनी निष्प्रभ !

अलेक्झांड्रासमोर पद्मिनी निष्प्रभ !

अमोल मचाले, पुणे
अव्वल दर्जाचे खेळाडू महत्वाच्या लढतींत क्षणी आपली कामगिरी उंचावतात, याचे उदाहरण आज जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत अलेक्झांड्रा गोर्याचकिना हिच्या रुपात बघायला मिळाले. सहाव्या फेरीपर्यंत अव्वल मानांकनाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या या रशियन खेळाडूने सातव्या फेरीत फिलिपाईन्सच्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध लक्षणीय विजय मिळवला होता. या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या वूमन ग्रॅण्डमास्टर अलेक्झांड्राने आज मुलींच्या गटात भारतातर्फे विजेतेपदाची दावेदार पद्मिनी रोत हिला आठव्या फेरीत पराभूत करीत विजेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली.
पुण्यात सुरू असलेल्या या स्पर्धेत खुल्या आणि मुलींच्या गटात रशियन खेळाडूंना अव्वल मानांकन आहे. १३ फेरींच्या या स्पर्धेच्या पूर्वार्धात म्हणजे सातव्या फेरीपर्यंत अलेक्झांड्रा चाचपडत खेळत होती, तर खुल्या गटात ग्रॅण्डमास्टर व्लादिमीर फेडोसीव यालाही लौकिकानुसार कामगिरी करता आली नव्हती. काल विश्रांतीचा दिवस होता. त्यानंतर आज फ्रेश मुडने खेळणाऱ्या दोन्ही रशियन खेळाडूंनी आठव्या फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धोक्याचा इशारा देणारे विजय नोंदवले. अलेक्झांड्राने पद्मिनीला ३४ चालींनंतर नमते घ्यायला भाग पाडले.
फेडोसीव विरुद्ध नेदरलॅण्ड्सचा क्विंटन ड्युकार्मोन लढतीत खेळल्या गेलेल्या चाली ग्रॅण्डमास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर या दर्जातील फरक ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या होत्या. क्विंटनने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी प्रारंभ केल्यावर फेडोसीवने आपला बचाव काही चालींनंतर रूई लोपेझ या ‘फेवरेट फिडेन्स’मध्ये रुपांतरित केला. १३व्या चालीपासून फेडोसीवने आक्रमणाला प्रारंभ केला. यातून सुटण्यासाठी क्विंटनने थोड्या उशीराने प्रयत्न केले. २८व्या चालीत या डच खेळाडूने रचलेली योजना नंतर त्याच्यावरच उलटली. येथेच क्विंटनचा पराभव निश्चित झाला. अखेर ३९ चालीत चेक मिळाल्यावर त्याने डाव सोडला.
सातव्या फेरीअखेर संयुक्त अव्वल स्थानी असलेली वूमन ग्रॅण्डमास्टर पद्मिनी आता ५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. अलेक्झांड्राने ६.५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले असून अ‍ॅना इवानोव हीदेखील संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. तिने रशियाच्या पुस्तोवितोवाववर मात केली. भारताच्या इवाना मारिया फुर्ताडो हिच्यासाठीही आजचा दिवस निराशेचा ठरला. इराणच्या सारादत खादेमाइशरेह हिने तिच्यावर विजय मिळवला. खादेमा आणि भारताची नंदिता ६ गुणांची कमाई करीत दुसऱ्या स्थानी आहेत. नंदिता आयोना जिलेपकडून पराभूत झाली. पद्मिनीसह इवानोव, अ‍ॅना चुम्पिताझ संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. मुलींमध्ये भारतीय खेळाडू पराभूत होत असताना प्रत्युषा बोडा हिने मात्र मिला झार्कोविकला नमवून आपली गुणसंख्या ५ वर नेऊन ठेवली.
कॉरी, नायराणन पराभूत
सातव्या फेरीअखेर एकटा आघाडीवर असलेला पाचवा मानांकित जॉर्ज कॉरी याला आज पराभवाचा हादरा बसला. त्याला अर्मेनियाच्या कॅ रेन ग्रिगोरियन याने पाणी पाजले. भारताचा इंटरॅशनल मास्टर सुनीलधूत नारायणन याने चीनच्या वेई यी याच्याविरुद्ध हार पत्करली. यामुळे ५.५ गुणांसह तो तिसऱ्या स्थानावर घसरला. या गटात ग्रिगोरियन, वेई यी, लू शेंगलेई प्रत्येकी ६.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. फेडोसीव, मिखाईल अ‍ॅन्टिपोव (६) दुसऱ्या स्थानी आहेत. पुण्याचा अभिमन्यू पुराणिक आज दुसरा मानांकित रॉबिन कॅम्पेनकडून पराभूत झाला.

Web Title: Padmini was incomplete before Alexandra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.