पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: November 18, 2016 00:15 IST2016-11-18T00:15:16+5:302016-11-18T00:15:16+5:30
सिंधूनेदेखील आपल्या चाहत्यांना निराश न करता अपेक्षित आगेकूच करीत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
फुझोउ (चीन) : स्टार शटलर सायना नेहवाल पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर चायना सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांच्या प्रमुख आशा रिओ आॅलिम्पिक रौप्य विजेत्या पी. व्ही. सिंधूवर होत्या. सिंधूनेदेखील आपल्या चाहत्यांना निराश न करता अपेक्षित आगेकूच करीत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच, पुरुष एकेरी गटात अजय जयरामनेही विजयी कूच करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सातवे मानांकन लाभलेल्या सिंधूने अमेरिकेच्या बेवेन झांगला तीन गेमपर्यंतच्या लढतीत १८-२१, २२-२०, २१-१७ असे नमवले. झांगने प्रत्येक गुणांसाठी सिंधूला झुंजवले. मात्र, आॅलिम्पिकमध्ये आपल्या झुंजार खेळाच्या जोरावर रौप्य जिंकलेल्या सिंधूने अखेरपर्यंत हार न मानता झांगचे आव्हान परतावले. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूपुढे चिनी ड्रॅगनचे आव्हान असून, बिंगजियाओ विरुद्ध तिला दोन हात करावे लागणार आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, फ्रेंच ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत सिंधूला बिंगजियाओविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सिंधूकडे आहे. दरम्यान, पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर सिंधूने जबरदस्त झुंजार खेळ केला. दुसऱ्या गेममध्ये तिने वेगवान स्मॅशच्या जोरावर ८-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, पुन्हा एकदा झांगने पुनरागमन करत तिला गाठले. १६-१६ अशी बरोबरी झाल्यानंतर सिंधूने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये वेगवान स्मॅशसह नेटजवळ मजबूत नियंत्रण मिळवत सामना जिंकला.
दुसरीकडे, अत्यंत चुरशीच्या झालेल्या पुरुष गटात जयरामने हाँगकाँगच्या वेइ नान याचे कडवे आव्हान २०-२२, २१-१९, २१-१२ असे नमवले. जयरामनेदेखील पहिला गेम गमावून पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये बाजी मारत सामना बरोबरीत आणल्यानंतर त्याने निर्णायक तिसऱ्या गेममध्ये तुफान आक्रमण करताना सहजपणे विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यापुढे आॅलिम्पिक चॅम्पियन, दोन वेळचा जागतिक विजेता व आॅल इंग्लंड चॅम्पियन असलेला चीनच्या चेन लोंगचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)