पी. व्ही. सिंधूकडून पदकाची आशा
By Admin | Updated: October 18, 2016 04:36 IST2016-10-18T04:36:10+5:302016-10-18T04:36:10+5:30
आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू रिओ आॅलिम्पिकनंतर या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सर्किटवर पुनरागमन करीत असून

पी. व्ही. सिंधूकडून पदकाची आशा
ओडेंसे : आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू रिओ आॅलिम्पिकनंतर या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सर्किटवर पुनरागमन करीत असून उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत तिच्याकडून भारताला अपेक्षा असतील.
रिओतून परतल्यानंतर सन्मान सोहळ्यात व्यस्त राहिलेल्या सिंधूचे लक्ष्य हे आॅलिम्पिकमधील लय कायम ठेवण्यावर असेल. ती आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू आहे. सहाव्या मानांकित सिंधू ही पहिल्या फेरीत चीनच्याही बिंगजियाओ हिच्याविरुद्ध दोन हात करील. त्यानंतर सिंधूची थायलंडची द्वितीय मानांकित रेचानोक इंतानोन, कोरियाची चौथी मानांकित सुंग जि ह्यून आणि चीन तैपेईची पाचवी मानांकित तेइ झू यिंग हिच्याशी लढत होऊ शकते.
सायना नेहवाल गुडघेदुखीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाही, त्यामुळे भारताच्या अपेक्षांची दारोमदार सिंधूवर असेल. सिंधूने म्हटले, ‘‘आॅलिम्पिकमुळे मला आत्मविश्वास मिळाला आहे आणि तो पुढेही कायम राहील, अशी आशा आहे. येथे माझ्यावर जबाबदारी जास्त असेल. मी कोर्टवर आपले शंभर टक्के योगदान देऊ इच्छिते.’’ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला आतापर्यंत एकही सुपर सिरीज जिंकता आली नाही आणि गेल्या वर्षी ती डेन्मार्क ओपनमध्ये उपविजेती होती.
पुरुष एकेरीत अजय जयराम डच ओपन ग्रांप्री फायनलपर्यंत पोहोचल्यानंतर आता तीच लय कायम ठेवू इच्छिल. त्याची सलामीची लढत थायलंडच्या बूनसाक पोन्साना याच्याशी आहे. रिओ आॅलिम्पिक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला श्रीकांत पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे, तर बी. साई प्रणीत, एच. एस. प्रणय आणि पी. कश्यप यांच्यावर भारताची मदार असेल. बी. साई प्रणीतची लढत थायलंडच्या तानोंगसाक याच्याशी होणार आहे, तर प्रणय क्वालिफायरशी खेळेल. राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन कश्यपचा सामना एस्तोनियाच्या राऊल मस्टशी होईल.
पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांचा सामना डेन्मार्कच्या किम एस्ट्रप आणि अँडर्स स्कारप आर. यांच्याशी, तर प्रणव जेरी चोपडा व अक्षय देवलकर आठव्या मानांकित चीनच्या लि जुन्हुई आणि लियू युंचेनविरुद्ध खेळतील. मिश्र दुहेरीत प्रणव व एन. सिक्की रेड्डी यांची लढत डेन्मार्कच्या जोकिम फिशर निल्सन व क्रिस्टिना पेडरसन यांच्याशी होईल.