कौशलचा ‘दुसरा’ नियमबाह्य
By Admin | Updated: September 29, 2015 23:27 IST2015-09-29T23:27:21+5:302015-09-29T23:27:21+5:30
श्रीलंकेचा आॅफस्पिनर थारिंडू कौशलच्या गोलंदाजी शैलीची चेन्नईमध्ये चाचणी झाली असून त्यानंतर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘दुसरा’ या चेंडूचा वापर

कौशलचा ‘दुसरा’ नियमबाह्य
कोलंबो : श्रीलंकेचा आॅफस्पिनर थारिंडू कौशलच्या गोलंदाजी शैलीची चेन्नईमध्ये चाचणी झाली असून त्यानंतर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘दुसरा’ या चेंडूचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. श्रीलंकेचा गोलंदाज कौशलचा ‘दुसरा’ हा चेंडू नियमानुसार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याच्या आॅफब्रेक गोलंदाजीमध्ये दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला आॅफब्रेक गोलंदाजीसाठी हिरवा कंदील मिळाला असून केवळ ‘दुसरा’ टाकण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
कौशलची गोलंदाजी शैली सदोष असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या गोलंदाजी शैलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यता असलेल्या चेन्नई येथील श्री. रामचंद्रन युनिव्हर्सिटीमध्ये चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान आॅफब्रेक गोलंदाजी करताना कौशलच्या हाताचा कोपर आयसीसी नियमानुसार १५ अंशांच्या आत वाकत असल्याचे दिसले, पण ‘दुसरा’ हा चेंडू टाकताना त्याच्या हाताचा कोपर निर्धारित अंशांपेक्षा अधिक वाकत असल्याचे दिसले. भारत व श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान कौशलच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप नोंदवण्यात
आला होता. यापूर्वी श्रीलंकेचा फिरकीपटू सचित्र सेनानायकेच्या गोलंदाजी शैलीवरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. (वृत्तसंस्था)