आमचं नातं शब्दांच्या पलीकडलं...
By Admin | Updated: November 6, 2014 06:10 IST2014-11-06T06:10:10+5:302014-11-06T06:10:10+5:30
भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर याने २२ वर्षे क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर गारुड केले होते. आपल्या शैलीने त्याने अनेकांच्या मनावर राज्य केले.

आमचं नातं शब्दांच्या पलीकडलं...
विनय नायडू, मुंबई
भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर याने २२ वर्षे क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर गारुड केले होते. आपल्या शैलीने त्याने अनेकांच्या मनावर राज्य केले. १६ व्या वर्षी कसोटीत पदार्पण करणाऱ्या या मुंबईच्या पोराने आज आपले आत्मचरित्र लिहिले आहे. ‘प्लेर्इंग इट माय वे’मधून सचिनने आपल्या आयुष्यावर कटाक्ष टाकला आहे. यातील काही उताऱ्यांमुळे प्रसिद्धीपूर्वीच वादळ निर्माण झाले असले तरी कधीही वादात न अडकलेल्या सचिनने आपण यात प्रामाणिकपणे सर्व गोष्टी लिहिल्याचे सांगितले आहे.
सचिनने बुधवारी पुस्तक प्रकाशनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील निवडक पत्रकारांसमवेत स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या वेळी त्याने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘‘आत्मचरित्रातील अन्य कोणत्याही भागापेक्षा अंजलीबरोबरचे नातेसंबंध शब्दबद्ध करणे सर्वांत कठीण होते. आमच्या दोघांचं नातं हे शब्दांपलीकडलं आहे’’, अशा शब्दात सचिनने आपले प्रेमबंध उलगडले.
माझ्या कारकिर्दीतील सर्वच गोष्टी आठवणे मला शक्य नव्हते. मला यासाठी काही काळ द्यावा लागला. अंजलीबरोबच्या गोष्टी ‘शेअर’ करणे सर्वांत कठीण होते. ते क्षण मी नेहमीच माझ्या हृदयाजवळ ठेवले आहेत. खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. माझ्या कुटुंबीयांशिवाय अन्य लोकांना याबद्दल जास्त काही माहिती नाही.’’
सचिनने आपल्या आत्मचरित्रातील काही गोष्टींचीही या वेळी चर्चा केली. तो म्हणाला, ‘‘यात काही मजेदार किस्से, काही वाद आहेत. त्याचबरोबर माझ्या मानसिक तयारीबद्दलही मी लिहिले आहे. मला लिहिताना सर्वांत कठीण गेलेला भाग म्हणजे माझे वैयक्तिक आयुष्य.’’
आत्मचरित्र लिहिण्यासाठी तो कसा तयार झाला, याबद्दलही त्याने यावेळी सांगितले. ‘‘यासाठी माझ्या कुटुंबाने प्रयत्न केले. त्याचबरोबर मलाही लिहावेसे वाटले. कारण आमच्या कुटुंबाला तशी पार्श्वभूमी होतीच. माझे वडील लेखक होते. माझा मोठा भाऊ अजित यानेही पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे मला ही एक चांगली संधी होती. तसेच मला प्रत्येकाशी काही गोष्टी सांगायच्या होत्या.’’ कसोटीमध्ये ५१ शतके झळकावणारा हा एकमेव फलंदाज म्हणाला, ‘‘हे पुस्तक माझ्या आठवणींवर आधारित आहे. मी क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला तेव्हा मी डायरी लिहीत असे. दुर्दैवाने ती डायरी हरवली. पहिली दोन वर्षे मी बाद कसा झालो, मी कोठे धावा केल्या आणि मी फटकावलेले चौकार याबद्दल लिहीत असे. भारताकडून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर पहिली दहा वर्षे मी आणि अजित घरी व्हिडिओ कॅसेटवर माझी शतके आणि मी बाद कसा झालो, हे पाहत असू. नंतर हेही बंद झाले. एक कर्णधार म्हणून आलेले अपयश हे नेहमीच सलते. मी कर्णधार असताना आम्हाला यशही मिळाले. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यामधील काही सामने आम्ही नक्कीच जिंकले असते; मात्र तसे झाले नाही. हे खूपच निराशाजनक होते. त्यामुळे मी खूपच डिस्टर्ब झालो होतो. याचा परिणाम माझ्या वैयक्तिक तसेच खेळावरही झाला होता. त्यामुळे मी फक्त खेळाडू म्हणून राहण्याचा आणि कर्णधाराला योग्य तो सल्ला देण्याचा निर्णय घेतला.’’ सचिनने कोणत्याही वादावर भाष्य केले नाही, या मताबद्दल तो म्हणाला, ‘‘मी एखाद्या वादावेळी बाजू घेतली नाही असे लोकांना वाटते. मात्र मला जेव्हा शंभर टक्के खात्री होती, त्या प्रत्येक वेळी मी माझे मत व्यक्त केले आहे. मात्र जेथे मला काही माहिती नव्हती, त्या वेळी मी मतप्रदर्शन करणे टाळले.’’
‘२००७ मध्ये आरशानेही सचिनला निवृत्त हो असे सांगितले होते’ या इयान चॅपेलने केलेल्या टीकेचाही सचिनने या वेळी समाचार घेतला. ‘‘आम्ही २००७-०८ ची व्ही. बी. मालिका जिंकून त्यांना आरशाचा आकार दाखवून दिला होता. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी काहीही केले नाही. हे त्यांचे मत असून त्याकडे लोकांनी खूप लक्ष देण्याची गरज नाही,’’ असेही त्याने सांगितले. ‘‘मला त्यांचा प्रतिवाद करण्याची काहीच गरज नव्हती. देवाच्या कृपेने माझ्या बॅटनेच त्यांना उत्तर दिले. २०१० मध्ये ते मला डर्बन येथे भेटले होते. या वेळी त्यांनी मला विचारले की, ‘तुझ्या यशाचे रहस्य काय?’ मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही सोयिस्कररीत्या भूमिका बदलत आहात.’’ २०११च्या विश्वचषकानंतरही खेळण्याच्या निर्णयाबाबत तो म्हणाला, ‘‘मला खेळायचे होते आणि त्याचा आनंद घ्यायचा होता. याबाबत माझी कधीही द्विधा मनस्थिती नव्हती. मी फक्त तो क्षण जगण्याचा विचार करत होतो. आम्ही २१ वर्षे विश्वचषकाची वाट पाहिली होती. त्यामुळे आपण अजून खेळावे, असे मला वाटत होते. मी चांगले खेळत होतो आणि धावाही निघत होत्या. मला माझ्या निवृत्तीची घोषणा एकदाच करायची होती आणि माझ्या मनाप्रमाणे या गोष्टी घडल्या याचा मला आनंद आहे.’’