आमचे सुवर्णयुग मावळतीकडे ! नदालची खंत
By Admin | Updated: June 10, 2014 11:26 IST2014-06-10T11:25:52+5:302014-06-10T11:26:34+5:30
रॉजर फेडरर, नोवाक जोकोव्हिच, अँण्डी मरे आणि स्वत: राफेल नदाल हे या सुवर्णयुगातील अव्वल टेनिसपटू. मात्र, हे युग आता मावळतीला लागल्याची खंत स्वत: नदालने व्यक्त केली आहे.

आमचे सुवर्णयुग मावळतीकडे ! नदालची खंत
रॉजर फेडरर, नोवाक जोकोव्हिच, अँण्डी मरे यांचा काळ संपला
पॅरिस: रॉजर फेडरर, नोवाक जोकोव्हिच, अँण्डी मरे आणि स्वत: राफेल नदाल हे या सुवर्णयुगातील अव्वल टेनिसपटू. मात्र, हे युग आता मावळतीला लागल्याची खंत स्वत: नदालने व्यक्त केली आहे.
स्पेनच्या अव्वल मानांकित नदालने कारकिर्दीतील नववे फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले. या विक्रमी विजयानंतर मात्र तो फिलीप चाट्रीयर कोर्टवर भावुक झाला. टेनिसमधील एका नव्या पर्वाला सुरुवात होईल, असे जणू भाकीतही त्याने केले.
पॅरिसच्या धरतीवरकारकिर्दीत केवळ एकदाच नदालला विजयाने हुलकावणी दिली, ती म्हणजे २00५मध्ये. तो तेव्हा केवळ १९ वर्षांचा होता. आता १0व्या विजेतेपदासाठी २0१५मध्ये जेव्हा कोर्टवर उतरेल तेव्हा तो २९ वर्षांचा असेल. तर सध्याचा उपविजेता नोवाक जोकोव्हिच आणि विम्बल्डन चॅम्पियन अँण्डी मरे हे दोघेही २८ वर्षांचे असतील. फेडररने तर ३४व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यामुळे या आघाडीच्या टेनिसपटूंचा काळ आता मावळतीकडे लागलाय, अशी खंत नदालला सतावत आहे; आणि म्हणूनच 'यंदाचे वर्ष टेनिससाठी विविध कारणांनी भावनिक ठरेल,' असे फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर तो म्हणाला होता.
'मी सध्या २८ वर्षांचा आहे. मी खूप मेहनत घेतलीय. मला प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा आहे आणि माझ्यासमोर खूप मोठय़ा संधीही आहेत; पण प्रत्येक वेळी तुम्ही यशस्वी होताच असे नाही. माझ्यासोबतच इतर खेळाडू आता शर्यतीतून बाहेर होत आहेत. आम्ही बर्याच कालावधीपासून खेळत आलोय. एक पिढी संपल्यानंतर दुसरी पिढी त्या ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण करते, हे वास्तवच आहे. याचा अर्थ, हे एका रात्रीतच संपणार असे नाही; पण ते तेवढेच सत्य आहे. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात जर दुसरा सेट जिंकला नसता तर कदाचित फ्रेंच ओपनचा चषक माझ्या हातात नसता, असे नदालने सांगितले.
दुसरीकडे, नदालचे काका तसेच प्रशिक्षक टोनी नदाल यांना तो दहावा फ्रेंच ओपनचा किताबही पटकावणार, असा विश्वास आहे. ते म्हणाले, मला आशा आहे की तो १0वा किताबही जिंकेल; पण ही फार कठीण गोष्ट असेल. कारण, प्रत्येक वर्षी विजयाच्या संधी कमी-कमी होत जातात.
१७0 गुणांचे अंतर
नवी दिल्ली: क्ले कोर्टचा बादशहा स्पेनचा राफेल नदाल याने विक्रमी नवव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावत अव्वल स्थान आबाधित राखले आहेत. असे असले तरी नोवाक जोकोव्हिच आणि नदाल यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारी गुणांमध्ये केवळ १७0 गुणांचा फरक राहिला आहे.
फ्रेंच ओपन सुरु होण्यापुर्वी नदाल (१२,५00) व जोकोविच (११,८५0) यांच्यामध्ये ६५0 गुणांचा फरक होता. विजेतेपद पटकावून देखील नदालला एकही गुण मिळाला नाही. त्याचवेळी दुसर्या बाजूला उपविजेता ठरलेल्या जोकोव्हिचला मात्र ४८0 गुण मिळाले. एकूणच सध्या नदालच्या अग्रस्थानाला जोकोव्हिचचा अडथळा बनला आहे.