‘टॉप थ्री’ हे आमचे लक्ष्य : सरदारा

By Admin | Updated: June 10, 2015 01:27 IST2015-06-10T01:27:08+5:302015-06-10T01:27:08+5:30

एफआयएच विश्व हॉकी लीगमध्ये पहिल्या तीन संघांत स्थान पटकावण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याची माहिती भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारासिंग याने दिली.

Our goal is 'Top Three': Sardar | ‘टॉप थ्री’ हे आमचे लक्ष्य : सरदारा

‘टॉप थ्री’ हे आमचे लक्ष्य : सरदारा

नवी दिल्ली : एफआयएच विश्व हॉकी लीगमध्ये पहिल्या तीन संघांत स्थान पटकावण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याची माहिती भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारासिंग याने दिली. मनोबल उंचावलेला भारतीय संघ सोमवारी रात्री बेल्जियमकडे रवाना झाला, त्या वेळी कर्णधाराने हा निर्धार बोलून दाखविला.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सरदारा म्हणाला, ‘‘बेल्जियममध्ये पाय ठेवल्यानंतर तेथील परिस्थितीशी एकरूप होण्यास आमच्याकडे दहा दिवसांचा अवधी असेल. मुख्य स्पर्धेपूर्वी चार सराव सामनेदेखील खेळायचे आहेत. ही स्पर्धा आमच्यासाठी मोलाची आहे. मोठ्या संघांविरुद्ध खेळताना आम्हाला आपल्या उणिवा शोधणे व त्या
दूर करण्यास वाव असेल.
कुठलाही सामना सहज घेणार नसून पहिल्या तीन संघांत स्थान मिळविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.’’
ही स्पर्धा अर्थात युवा खेळाडूंना कौशल्य दाखविण्यासाठी चांगले व्यासपीठ असेल. २० जून ते ५ जुलै या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत भारतासह १० देश खेळतील. संघांना प्रत्येकी ५ असे दोन गटांत विभागण्यात येणार आहे. स्पर्धेत अव्वल चार स्थानांवर येणारे संघ भारताच्या यजमानपदाखाली आगामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आयोजित विश्व हॉकी लीगसाठी
पात्र ठरतील. याशिवाय अव्वल तीन संघांना २०१६च्या रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे. भारताने २०१४च्या आशियाई क्रीडास्पर्धेचे सुवर्ण जिंकल्यामुळे भारत आधीच आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला.
भारतीय संघाचे कोच पॉल वॉन एस म्हणाले, ‘‘भारतीय संघात कमालीची सुधारणा झाली आहे. तयारी शिबिरात आम्ही संघातील ताळमेळ आणि डावपेच यांवर काम केले. आता आमचे खेळाडू कुठल्याही पोझिशनवर खेळण्यास सज्ज असून, सराव सामन्याद्वारे आमचा संघ अधिक तगडा होईल. सामन्यागणिक प्रगती साधण्यावर आम्ही भर देणार आहोत. मला या संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.’’
एशियाडचे सुवर्ण जिंकणाऱ्या भारताने अझलान शाह कपमध्ये आॅस्ट्रेलियाला धूळ चारली होती. भारताचा पहिला सामना २० जून रोजी फ्रान्सविरुद्ध भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता होईल.
(वृत्तसंस्था)

Web Title: Our goal is 'Top Three': Sardar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.