ऑस्कर पिस्टोरियसला ५ वर्षांचा कारावास
By Admin | Updated: October 21, 2014 16:31 IST2014-10-21T14:54:32+5:302014-10-21T16:31:33+5:30
धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला त्याची मैत्रिण रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ऑस्कर पिस्टोरियसला ५ वर्षांचा कारावास
ऑनलाइन लोकमत
स्टेलेनबोस्च ( दक्षिण आफ्रिका), दि. २१ - 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला त्याची मैत्रिण रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने हा निर्णय सुनावला असून त्यानंतर लगेचच ऑस्करची रवानगी तुरूंगात करण्यात आली.
२०१३ साली व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी मॉडेल रिव्हा स्टिनकॅम्प हिची हत्या झाली होती व ऑस्करवर तिच्या खुनाचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणी गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने पिस्टोरियसची रिव्हाच्या पूर्वनियोजित हत्येच्या आरोपातून सुटका केली होती मात्र त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते.
व त्याला दहा वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, रिव्हाच्या मृत्यूमुळे ऑस्कर आधीच दु:खी असून त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी असे बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
लहानपणीच दोन्ही पाय गमवावे लागणारा ऑस्कर क्रीडा जगतात 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध आहे. अपंगांसाठीच्या पॅराऑलिम्पिकमध्ये त्याने विशेष चमक दाखवली होती.