ऑरेंज व पर्पल कॅप भारतीय खेळाडूंकडे
By Admin | Updated: May 6, 2015 02:33 IST2015-05-05T23:41:20+5:302015-05-06T02:33:04+5:30
आयपीएलच्या आठव्या पर्वात सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट घेणार्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंनी विदेशी खेळाडूंवर वर्चस्व गाजवले आहे.
ऑरेंज व पर्पल कॅप भारतीय खेळाडूंकडे
नवी दिल्ली : आयपीएलच्या आठव्या पर्वात सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट घेणार्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंनी विदेशी खेळाडूंवर वर्चस्व गाजवले आहे. सध्या ऑरेंज व पर्पल कॅप भारतीय खेळाडूंच्या डोक्यावर आहे.
राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे (४३० धावा) फटकावणार्या फलंदाजांमध्ये सर्वांत आघाडीवर आहे. अनेक दिवसांपासून ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आहे. चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहरा (१७ बळी) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. नेहराने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध तीन बळी घेतले होते.
रहाणेला सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डेव्हिड वॉर्नरकडून कडवे आव्हान मिळत आहे. वॉर्नरने ९ सामन्यांत ३८२ धावा फटकावल्या आहेत. चेन्नई संघाचा ब्रेन्डन मॅक्युलम (३१५) तिसर्या, बंगळुरूचा विराट कोहली (३०३) चौथ्या आणि मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा (२९७) पाचव्या स्थानी आहे.
आयपीएलच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल व ऑस्ट्रेलियाचा माईक हसी यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. गेलने २०१२ मध्ये या स्पर्धेत ७३३ धावा फटकावल्या होत्या; तर हसीने २०१३ मध्ये ७३३ धावा फटकावण्याची कामगिरी केली होती.
सर्वाधिक बळी घेणार्या आशीष नेहराला त्याचा चेन्नई संघाचा सहकारी ड्वेन ब्राव्होचे आव्हान आहे. ब्राव्होने १० सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. दिल्ली डेअर डेव्हिल्सचा लेगस्पिनर इम्रान ताहिर, हैदराबादचा भुवनेश्वर कुमार व मुंबईचा लसिथ मलिंगा यांच्या नावावर प्रत्येकी १३ बळींची नोंद आहे.
ब्राव्होच्या नावावर एका स्पर्धेत सर्वाधिक ३२ बळी घेण्याच्या कामगिरीची नोंद आहे. ब्राव्होने हा पराक्रम २०१३ मध्ये केला होता. लसिथ मलिंगाने २०११ मध्ये २८ बळी व जेम्स फॉल्कनरने २०१३ मध्ये २८ बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)