कबड्डीत दोन सुवर्णपदकांची संधी
By Admin | Updated: October 3, 2014 01:22 IST2014-10-03T01:22:11+5:302014-10-03T01:22:11+5:30
भारतीय महिला कबड्डी संघाने थायलंडचा 41-28 असा तर पुरुष संघाने यजमान कोरियाचा 36-25 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

कबड्डीत दोन सुवर्णपदकांची संधी
>इंचियोन : भारतीय महिला कबड्डी संघाने थायलंडचा 41-28 असा तर पुरुष संघाने यजमान कोरियाचा 36-25 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारताच्या महिलांनी थायलंडचा पराभव केला खरा पण त्याकरिता त्यांच्या नाकी दम आला. 13व्या मिनिटाला तर थायलंडने 13-12 अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघाने सुरुवात तर झोकात केली होती. परंतु थायलंडने कडवी लढत दिली. मध्यांतराला दोन्ही संघ 14-14 असे बरोबरीत होते. मध्यांतरानंतर मात्र भारताने गिअर बदलला. मध्यांतरानंतर पहिला लोण चढवित भारताने 18-15 अशी आघाडी घेतली. ताबडतोब दुसरा लोण देत ती आघाडी 34-24 अशी वाढविली. शेवटी 41-28 असा सामना खिशात टाकला. भारताने चढाईत 19 गुण, बोनस 5, पकडी करीत 13 तर दोन लोणचे 4 असे 41 गुण कमविले तर थायलंडने चढाईत 11, पकडी करीत 6 तर 11 गुण बोनस करीत मिळविले. भारताच्या तेजस्विनीने 21 चढायांत 15 झटापटीचे तर 3 बोनस गुण मिळविले. 2 वेळा तिची पकड झाली. अभिलाषाने 5 चढायांत 2 गुण घेतले. एकदा तिची पकड झाली. किशोरीने 3 यशस्वी पकडी केल्या. भारताची अंतिम लढत बांगलादेशला 40-15 असे पराभूत करणा:या इराणशी होईल.
पुरुषांच्या उपांत्य फेरीत भारताने यजमान कोरियाला 36-25 असे नमविले. भारताने बोनस गुणाने खाते खोलले परंतु कोरियाने त्यांना जशास तसे उत्तर देत कडवी लढत दिली. मध्यांतराला भारताकडे 14.12 अशी नाममात्र आघाडी होती. भारताने शेवटी आपला हुकमी चढाईचा खेळाडू अजय गफूरला खेळविले. त्याने आणि जसबीरने भारताला सुस्थितीत आणले.
मध्यांतरानंतर आला वेग
मध्यांतरानंतर 5व्या मिनिटाला लोण देत भारताने 23-14 अशी आघाडी घेतली. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा 31-21 अशी 10 गुणांची आघाडी भारताकडे होती. भारताने चढायांत 17 गुण, यशस्वी पकडी करीत 9 गुण, 8 बोनस तर 1 लोण देत 2 गुण अशा प्रकारे गुण घेतले. भारताच्या जसबीरने 16 चढायांत 9 झटापटीचे तर 2 बोनस मिळवला, 1 वेळा त्याची पकड झाली. अनुपने 10 चढायांत 3 झटापटीचे तर 3 बोनस गुण घेतले. 1 वेळा त्याची पकड झाली. भारताचा अंतिम सामना बांगलादेशला 40-15 असे पराभूत करणा:या इराणशी होईल.