आयर्लंडला बाजू भक्कम करण्याची संधी

By Admin | Updated: March 7, 2015 01:46 IST2015-03-07T01:46:41+5:302015-03-07T01:46:41+5:30

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आयरीश संघ शनिवारी झिम्बाब्वे विरुध्द विजय मिळवून उपांत्यपुर्व फेरी गाठण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

The opportunity to make Ireland stand strong | आयर्लंडला बाजू भक्कम करण्याची संधी

आयर्लंडला बाजू भक्कम करण्याची संधी

होबार्ट : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आयरीश संघ शनिवारी झिम्बाब्वे विरुध्द विजय मिळवून उपांत्यपुर्व फेरी गाठण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
स्पर्धेच्या ‘ब’ गटातून विजयी सुरुवात केलेल्या आयर्लंड संघ ३ सामन्यांतून एक पराभव व दोन विजयांसह ४ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर झिम्बाब्वे संघ चार सामन्यातून एक विजय व तीन पराभवांसह २ गुणांसहीत सहाव्या स्थानी आहे. आयसीसीच्या सहयोगी असलेल्या देशांपैकी आयर्लंडने यंदाच्या स्पर्धेत सर्वांनाच चकीत केले असून झिम्बाब्वे विरुध्द बाजी मारुन बाद फेरीत प्रवेश करण्याचा दिशेने भक्कम पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. शिवाय यानंतर पुढे त्यांचा सामना पाकिस्तान व भारत विरुद्ध असल्याने झिम्बाब्वे विरुद्ध विजयाची संधी शक्यतो गमावणार नाही.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या झिम्बाब्वेला स्पर्धेतील उरली सुरली आशा टिकवून ठेवण्यासाठी आयर्लंड विरुध्द विजय अनिवार्य बनले आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना बलाढ्य भारत विरुध्द असल्याने झिम्बाब्वे समोरील आव्हान कठीण बनले आहे. त्यात भर म्हणजे आयर्लंड विरुध्द झिम्बाब्वेला कर्णधार एल्टन चिंगम्बुरा शिवाय खेळावे लागणार आहे. पाकिस्तान विरुध्द निसटता पराभव स्वीकाराव्या लागलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चिगंम्बुराच्या मांडीला दुखापत झाली होती आणि अद्यापही त्या दुखापतीतून तो सावरला नसल्याने झिम्बाब्वे समोरील अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ब्रेंडन टेलर संघाची धुरा सांभाळेल.
विशेष म्हणजे स्पर्धा इतिहासामध्ये यापुर्वी एकदाच आमने-सामने आलेल्या या दोन संघातील सामना टाय झालेला. २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेत थरारकरीत्या झालेल्या या सामन्याच्या जोरावर आयर्लंडने त्यावेळी नाट्यमयरीत्या सुपर एट गटात धडक मारली होती. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांत हे दोन्ही संघ एकूण ५ वेळा एकमेकांविरुध्द खेळले असून ३ वेळा आयर्लंडने बाजी मारली आहे. तर झिम्बाब्वेने एकदा विजय मिळवला आणि एक सामना टाय झाला आहे. जर का या सामन्यात आयर्लंडने बाजी मारली तर त्यांचा स्पर्धेतील हा तिसरा विजय असेल व आतापर्यंत खेळलेल्या विश्वचषक स्पर्धेपैकी ही त्यांची सर्वांत यशस्वी स्पर्धा ठरेल.

हेड टू हेड
आयर्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत ५ लढती झाल्या आहेत. यामध्ये झिम्बाब्वे संघाने ३ वेळा विजय नोंदविला आहे. आयर्लंड संघाला एकच विजय मिळविता आला असून १ लढत टाय झाली आहे.

द. आफ्रिकेविरुध्द झालेल्या मोठ्या पराभवाने आमचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. संघातील वातावरण नेहमीसारखे आहे, जे खुप महत्त्वाचे आहे. आम्ही सकारात्मक विचार करुनच खेळणार असून या सामन्यात आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न असेल.
- विलियम पोर्टरफील्ड,
कर्णधार आयर्लंड

आयर्लंड : विलियम पोर्टेरफिल्ड (कर्णधार), अँडी बाल्ब्रीनी, पीटर चॅसे, अ‍ॅलेक्स कुसाक्स, जॉर्ज डॉक्रेल, एड जॉयसे, अँडी मॅकब्रीन, जॉन मूनी, केवीन ओब्राइन, नेल ओब्राइन (यष्टीरक्षक), मॅक्स सोरेन्सेन, पॉल स्टीर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन (यष्टीरक्षक), क्रेग यंग.

झिम्बाब्वे : एल्टॉन चिगुम्बुरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा (यष्टीरक्षक), तेंडाई चतारा, चामू चिभाभा, क्रेग एर्विन, तफाड्जवा कामुंगोजी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मात्सीकेंयेरी, सोलोमोन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पन्यांगरा, सिकंदर रझा, बेंडन टेलर (यष्टीरक्षक), प्रोस्पर उत्सेया, सिन विलियम्स.

अजूनही सर्वकाही संपलेले नाही. या सामन्यात विजय मिळवून बाद फेरी गाठण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. पुढील दोन्ही सामने आमच्यासाठी बाद फेरीसारखेच आहेत.
- ब्रेंडन टेलर, कर्णधार, झिम्बाब्वे

Web Title: The opportunity to make Ireland stand strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.