गुजरात लॉयन्सला हॅट्ट्रिकची संधी
By Admin | Updated: April 16, 2016 03:31 IST2016-04-16T03:31:34+5:302016-04-16T03:31:34+5:30
आयपीएलचा नवा संघ गुजरात लॉयन्सची एन्ट्री धडाक्यात झाली. नवव्या सत्रात त्यांनी सलग दोन विजय साजरे केले. आज शनिवारी त्यांची गाठ पडेल ती मुंबई इंडियन्सशी.

गुजरात लॉयन्सला हॅट्ट्रिकची संधी
मुंबई : आयपीएलचा नवा संघ गुजरात लॉयन्सची एन्ट्री धडाक्यात झाली. नवव्या सत्रात त्यांनी सलग दोन विजय साजरे केले. आज शनिवारी त्यांची गाठ पडेल ती मुंबई इंडियन्सशी. मुंबईला त्यांच्याच घरी नमवित विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या निर्धाराने गुजरात संघ उतरणार आहे.
सुरेश रैनाच्या नेतृत्वात गुजरातने कमालीची कामगिरी केली. पहिल्या सामन्यात किंग्स पंजाबला पाच गड्यांनी आणि दुसऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील पुणे सुपर जॉयन्टस्ला सात गड्यांनी पराभूत केले. दुसरीकडे मुंबईने सलामीला पुण्याकडून नऊ गड्यांनी पराभवाचे तोंड पाहिले. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर केकेआरला पराभूत करीत विजयाची कास धरली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला घरच्या मैदानावर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल.
गुजरात संघात रैनासह अॅरोन फिंच, ब्रॅन्डन मॅक्यूलम, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक हे फलंदाज आहेत. फिंच जबर फॉर्ममध्ये असून दोन्ही सामन्यात अर्धशतके ठोकली. पण सलामीवीर वगळता अन्य फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले ही या संघाची कमकुवत बाजू.
गोलंदाजीत जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांची कामगिरी देखणी झाली पण मागच्या सामन्यात शादाब जकातीने चार षटकांत ४० धावा मोजल्याने रैना मुंबईविरुद्ध त्याच्याजागी उमंग शर्मा याला संधी देऊ शकतो. मुंबईने कोलकाता संघावर विजय नोंदविल्याने संघात उत्साहाचा संचार झाला. आता घरच्या मैदानावर चाहत्यांच्या साक्षीने गुजरातचा विजय रथ रोखण्यासाठी संपूर्ण क्षमतेनिशी कामगिरी करण्यास संघ सज्ज आहे. लेंडन सिमन्स जखमी होऊ बाहेर पडला तरी अन्य फलंदाज धावा काढण्यात सक्षम आहेत. जोस बटलरने मधल्या फळीत अनेकांचे लक्ष वेधले. बुमराह, साऊदी, हरभजन, मॅक्लेनगन गोलंदाजीची जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहेत. बुमराह आणि साऊदी मागच्या सामन्यात महागडे ठरल्याने मुंबईला गुजरातविरुद्ध सावध रहावे लागेल. (वृत्तसंस्था)