...तरच खेळाडूला विश्रांती : महेंद्रसिंह धोनी
By Admin | Updated: March 13, 2015 00:52 IST2015-03-13T00:52:09+5:302015-03-13T00:52:09+5:30
खेळाडू मोठ्या कालावधीपासून खेळत असले आणि संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले असले, तरीही एखादा खेळाडू जखमी झाल्यासच शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध

...तरच खेळाडूला विश्रांती : महेंद्रसिंह धोनी
आॅकलंड : खेळाडू मोठ्या कालावधीपासून खेळत असले आणि संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले असले, तरीही एखादा खेळाडू जखमी झाल्यासच शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक सामन्यात अंतिम ११ जणांत बदल केला जाईल, असे मत व्यक्त केले आहे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने.
धोनीचा संघात जास्त बदल न करण्याचा दृष्टिकोन असल्यास अम्बाती रायुडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी आणि भुवनेश्वर कुमार यांना अंतिम ११ जणांत स्थान मिळवणे कठीण होईल.
यांतील भुवनेश्वरने मोहंमद शमीच्या अनुपस्थितीत एक सामना खेळला होता. उमेश यादव, शमी आणि मोहित शर्मा या तेजतर्रार त्रिकुटाने भुवनेश्वरची उणीव भासू दिली नाही. त्याचप्रमाणे, संघातील नियमित खेळाडूला विश्रांती देण्याच्या मूडमध्ये आपण नसल्याचेही धोनीने स्पष्ट केले आहे. धोनीने पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर जे खेळाडू अंतिम ११ जणांच्या बाहेर आहेत ते बाहेरच असतील, असे स्पष्ट शब्दांत म्हटले होते.
हॅमिल्टनमध्ये आयर्लंडविरुद्ध सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने तर औपचारिक सामन्याच्या शब्दप्रयोगास विरोध का आहे, हेदेखील विस्ताराने स्पष्ट केले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल का, असे त्याला विचारण्यात आले तेव्हा धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला यासंबंधी फिजिओकडून माहिती घेण्याची आवश्यकता भासेल. जर फिजिओला वाटले, की अन्य खेळाडू जखमी होऊ शकतो, तर तशा परिस्थितीत आम्ही त्या खेळाडूला विश्रांती देऊ. अन्यथा, एखादा खेळाडू तंदुरुस्त आहे व निवडीसाठी उपलब्ध असेल, तर आम्ही आमचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ मैदानात उतरवू. त्याचप्रमाणे सामन्यादरम्यान विश्रांतीसाठी खेळाडूंना खूप कालावधी मिळाला आणि एवढी विश्रांती पुरेशी आहे. दुखापतीचा धोका नसल्यास आम्ही आमचा सर्वोत्तम संघ खेळवू.’’
हॅमिल्टनच्या सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती; परंतु धोनीला ईडन पार्कच्या खेळपट्टीवर चांगली उसळी मिळेल, अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)