सौम्यजित, मणिका यांना आॅलिम्पिक तिकीट
By Admin | Updated: April 15, 2016 04:14 IST2016-04-15T04:14:39+5:302016-04-15T04:14:39+5:30
भारताचा बलाढ्य टेबल टेनिसपटू सौम्यजित घोष व मणिका बत्रा यांनी हाँगकाँगला सुरू असलेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत आपापल्या गटात बाजी मारून आगेकूच केली. विशेष म्हणजे

सौम्यजित, मणिका यांना आॅलिम्पिक तिकीट
नवी दिल्ली : भारताचा बलाढ्य टेबल टेनिसपटू सौम्यजित घोष व मणिका बत्रा यांनी हाँगकाँगला सुरू असलेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत आपापल्या गटात बाजी मारून आगेकूच केली. विशेष म्हणजे, या विजयासह दोन्ही खेळाडूंनी आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले.
दक्षिण आशियाई विभागीय पात्रता स्पर्धेत या विभागातून
इतर कोणत्याही देशाने सहभाग
घेतला नसल्याने, स्पर्धा केवळ
भारतीय खेळाडूंमध्येच होती. चार खेळाडूंचा समावेश असलेल्या प्रत्येक गटात खेळाडूंना एकमेकांविरुद्ध
खेळावे लागले.
घोषने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना शरथ कमल, अँथोनी अमलराज आणि हरमीत देसाई यांना नमवून गटात अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीसह तो आॅलिम्पिक कोटा मिळविण्यातही यशस्वी ठरला. त्याचबरोबर मनिका आणि के. शमिनी यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले होते. मात्र, गटसाखळी सामन्यात मणिकाने शमिनीविरुद्ध बाजी मारली असल्याने आॅलिम्पिक तिकीट मणिकाला मिळाले. (वृत्तसंस्था)
विशेष म्हणजे, स्पर्धेत शरथ कमलची कामगिरी अत्यंत निराशाजनक आणि अनपेक्षित ठरली. कमल केवळ हरमीत देसाईविरुद्धच जिंकण्यात यशस्वी ठरला. तर, घोष आणि अँथोनी यांनी शानदार खेळ करताना भारताचा अव्वल खेळाडू शरथला नमवण्याचा पराक्रम केला. शरथने स्पर्धेतील एकमेव विजय मिळवताना हरमीतला ११-६, ११-९, १२-१०, १०-१२, ११-५ असे नमवले. त्याच वेळी घोषने शरथला ११-८, ११-५, ११-६, ११-७ असा सरळ चार गेममध्ये धक्का दिला.
यानंतर शरथला अँथोनीविरुद्धही ११-७, ११-४, ९-११, ११-९, १६-१८, ६-११, ७-११ असा पराभव पत्करावा लागला. दुखापतीचा फटका बसलेल्या शरथकडून त्याचा सर्वोत्तम खेळ झाला नाही. कसलेल्या शरथला सहजपणे नमवल्यानंतर घोषने हरमीतला ११-६, ११-९, १२-१०, १०-१२, ११-५ असे पराभूत केले. तर यानंतर घोषने आपला धडाका कायम राखताना अँथोनीला ११-८, ११-५, ११-६, ११-७ असे लोळवले.
दुसरीकडे, महिलांच्या गटात मणिकाची सुरुवात पराभवाने झाली. पूजा सहस्रबुद्धेकडून ७-११, ९-११, १२-१०, १०-१२,
११-५, ७-११ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर मणिकाने शानदार
पुनरागमन करताना शमिनीला ४-११, ११-९, ११-३, १५-१३, ८-११, ११-९ असे झुंजाररीत्या नमवले. मौमा दासविरुद्धही मणिकाने ११-५, ८-११, ८-११, ११-९, ११-६, ११-६ अशी बाजी मारली. त्याच वेळी शमिनीनेही दोन विजय मिळवताना मौमा दास आणि पूजा यांना अनुक्रमे ४-२ व ४-० असे नमवले. मात्र, याआधी मणिकाविरुद्ध झालेल्या पराभवामुळे तिच्या आशा संपुष्टात आल्या.