टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं तिच्या या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिचा जीवन प्रवास पाहिल्यास इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने किती खस्ता खाल्ल्या होत्या हे दिसून येईल. या काळात तिला अनेकांनी मदतही केली. अशाच एकेकाळी तिला मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा मीराबाईनं सत्कार केला. हे ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत नेत असत.
बजरंग लढला, पण 'सुवर्ण'शर्यतीतून बाहेर पडला, कांस्यपदकासाठी खेळावे लागणार
मीराबाई चानूचे कुटुंब अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगत होते. चानूच्या प्रशिक्षणावर होणारा रोजचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. चानूच्या घरापासून प्रशिक्षण केंद्र ३० किमी लांब होते. तिथे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात. हे पैसे पुरेसे नसत. असा परिस्थितीत चानूने एक मार्ग शोधून काढला होता. ती तिच्या घराजवळून जाणाऱ्या ट्रक ड्रायवरांकडे लिफ्ट मागत असे. त्यावेळी तिच्या मनात संकोच आणि भीती असे. मात्र धीर करून ती ट्रकमधून कोचिंग सेंटरमध्ये जात असे. काही दिवसांनंतर हे ट्रक ड्रायव्हरही तिला ओखळू लागले होते. तसेच तिचे घर जवळ येताच ते लांबूनच हॉर्न वाजवत असत. त्यामुळे चानूला वेळीच तयार होऊन ट्रकपर्यंत पोहोचता येत असे.