ऑलिम्पिक विजेत्याचा धुव्वा उडवत श्रीकांतचा ऑस्ट्रेलियन ओपनवर कब्जा
By Admin | Updated: June 25, 2017 13:11 IST2017-06-25T11:58:53+5:302017-06-25T13:11:29+5:30
ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या चेन लॉंगचा 22-20, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला

ऑलिम्पिक विजेत्याचा धुव्वा उडवत श्रीकांतचा ऑस्ट्रेलियन ओपनवर कब्जा
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 25 - गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियातही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. आज झालेल्या ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगचा 22-20, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील श्रीकांतचे हे चौथे सुपरसीरिज विजेतेपद आहे. याआधी त्याने 2014 साली चीन ओपन, 2015 साली इंडिया ओपन, 2017 साली इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद त्याने पटकावले होते. त्याबरोबरच श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या श्रीकांतने आज झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीतही जबरदस्त खेळ केला. समोर चीनचा ऑलिम्पिकविजेता खेळाडू चेन लाँग असूनही श्रीकांतच्या खेळावर त्याचा परिणाम दिसून आला नाही. त्याने सुरुवातीपासूनच लढतीवर वर्चस्व राखले. मात्र चेन लॉँगनेही त्याला कडवी टक्कर दिली. अटीतटीच्या पहिल्या गेममध्ये श्रीकांतने 22-20 अशी बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही श्रीकांतने 21-16 असा विजय मिळवत विजेतेपदावर कब्जा केला.