ईडनमध्ये होणार ‘नंबर वन’चा जल्लोष!
By Admin | Updated: October 3, 2016 06:02 IST2016-10-03T06:02:33+5:302016-10-03T06:02:33+5:30
रोहित शर्माने आपल्या आवडत्या ईडन गार्डन मैदानावर सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी ८२ धावांची खेळी केली

ईडनमध्ये होणार ‘नंबर वन’चा जल्लोष!
कोलकाता : रोहित शर्माने आपल्या आवडत्या ईडन गार्डन मैदानावर सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी ८२ धावांची खेळी केली आणि त्याने रिद्धिमान साहासोबत शतकी भागीदारी करीत भारताला न्यूझीलंडविरुद्ध ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून दिली. रोहित, साहा व विराट यांच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. गोलंदाजांसाठी अनुकूल इडनच्या खेळपट्टीवर चौथ्या डावात न्यूझीलंड संघासाठी लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे काम नाही. चौथ्या दिवशी सोमवारी टीम इंडिया हा कसोटी सामना जिंकत मानांकनामध्ये अव्वल स्थान पटकाविण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव २०४ धावांत गुंडाळत ११२ धावांची आघाडी घेणाऱ्या भारताने अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दुसऱ्या डावात ८ बाद २२७ धावांची मजल मारली होती. भारताकडे एकूण ३३९ धावांची आघाडी असून, अद्याप दोन विकेट शिल्लक आहेत. इडन गार्डनमध्ये आतापर्यंत विदेशी संघाची चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या २३३ आहे. ही धावसंख्या १९६१-६२ मध्ये इंग्लंडने फटकावली होती. त्यामुळे या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघापुढे मोठे आव्हान आहे.
पहिल्या डावात ३१६ धावा फटकाविणाऱ्या भारताची कर्णधार विराट कोहलीच्या ४५ धावांच्या खेळीनंतरही दुसऱ्या डावात एकवेळ ६ बाद १०६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रोहित व साहा (नाबाद ३९) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. इडनवर गेल्या पाच कसोटी सामन्यांत भारतातर्फे सातव्या विकेटसाठी ही पाचवी शतकी भागीदारी ठरली. आजचा खेळ थांबला, त्या वेळी साहा याला भुवनेश्वर कुमार (८) साथ देत होता.
सुरुवातीला जपून खेळणाऱ्या रोहितने त्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना काही आकर्षक फटके मारले. दुसऱ्या टोकाकडून साहाने त्याला योग्य साथ दिली. पहिल्या डावात नाबाद ५४ धावांची खेळी करणाऱ्या साहाने दुसऱ्या डावातही बचावात्मक व आक्रमक खेळाचा नजारा सादर केला. त्याने आतापर्यंत ८७ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार लगावले. त्याआधी, गेल्या काही लढतींमध्ये अपयशी ठरलेला कर्णधार कोहली बोल्टच्या एका कमी उसळलेल्या चेंडूवर पायचित झाला. कोहलीच्या खेळीत सात चौकारांचा समावेश आहे. त्याने रोहितसह पाचव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.
त्याआधी, कालच्या ७ बाद १२८ धावसंख्येवरुन पुढे खेळताना न्यूझीलंडचा पहिला डाव आज पहिल्या सत्रातच संपुष्टात आला. जतीन पटेलने (४७) काही आकर्षक फटके मारले. तो न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावा फटकाविणारा फलंदाज ठरला. पटेलने यष्टिरक्षक फलंदाज वॉटलिंगसोबत (२५) आठव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)
>धावा फटकावणे आवश्यक होते : रोहित
संघव्यवस्थापनाचे सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहेच, पण खेळपट्टीवर दाखल झाल्यानंतर, माझ्यासाठी धावा फटकावणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया भारताच्या दुसऱ्या डावात शानदार ८२ धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माने व्यक्त केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात रविवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, ‘मी या खेळीचा पूर्ण आनंद घेतला. माझे नियंत्रण असलेले फटकेच मी खेळले.’
पहिल्या डावात केवळ २ धावा काढून बाद झालेल्या रोहितच्या दुसऱ्या डावातील शानदार ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ३३९ धावांची दमदार आघाडी घेतली आहे. रोहित म्हणाला, ‘संघासाठी मोठी आघाडी मिळवणे आवश्यक होते. सुरुवातीलाच अधिक विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे भागीदारी होणे गरजेचे होते.
कर्णधार कोहली चुकीच्या वेळी दुर्दैवीपणे बाद झाला, पण तळाचे फलंदाज धावा फटकावू शकतात याचा विश्वास होता. मी रिद्धिमानसोबत चर्चा केली आणि फटके मारण्यासाठी योग्य चेंडूंची निवड केली.
या खेळपट्टीवर ३४० पेक्षा अधिक धावांची आघाडी दमदार ठरेल. आमच्या अजून दोन विकेट शिल्लक असून आघाडीत भर घालण्याची संधी आहे.’
>दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट : आश्विन
आश्विन म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिका संघ मजबूत मानला जातो. एबी डिव्हिलियर्स, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांचा संघात समावेश होता. टीकाकारांमुळे मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि कसून मेहनत घेत मी माझ्या खेळाचा दर्जा उंचावला. सामन्यात आमची स्थिती मजबूत होती.
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने डाव घोषित करीत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघापुढे ४५८ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. प्लेसिस व डिव्हिलियर्स यांनी शतके झळकावित आम्हाला विजयापासून दूर ठेवले. सामन्यानंतर वृत्तपत्रात मी वाचले की, प्लेसिस व डिव्हिलियर्सने भारताला विजयापासून दूर ठेवले. हे खरे होते, पण त्यानंतर मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली.’
आश्विन पुढे म्हणाला, त्यानंतर भारताच्या यजमानपदाखाली झालेल्या ६ कसोटी सामन्यांत शानदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात वेगळी ओळख निर्माण केली.’
या कालावधीत आश्विनने प्रत्येक लढतीत पाचच्या सरासरीने बळी घेतले. आश्विनने सध्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत पहिल्या लढतीत १० बळी घेतले आणि क्रिकेट इतिहासात सर्वांत वेगवान बळींचे द्विशतक पूर्ण करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला.
>धावफलक
भारत पहिला डाव ३१६. न्यूझीलंड पहिला डाव (कालच्या ७ बाद १२८ धावसंख्येवरून पुढे) :- वॉटलिंग पायचित गो. शमी २५, पटेल झे. शमी गो. आश्विन ४७, वॅगनर पायचित गो. शमी १०, बोल्ट नाबाद ०६. अवांतर (१९). एकूण ५३ षटकांत सर्वबाद २०४. बाद क्रम : ८-१८२, ९-१८७, १०-२०४. गोलंदाजी : भुवनेश्वर १५-२-४८-५, शमी १८-१७०-३, जडेजा १२-४-४०-१, आश्विन ८-३-३३-१.
भारत दुसरा डाव :- विजय झे. गुप्टील गो. हेन्री ०७, धवन पायचित गो. बोल्ट १७, पुजारा पायचित गो. हेन्री ०४, कोहली पायचित गो. बोल्ट ४५, रहाणे झे. बोल्ट गो. हेन्री ०१, रोहित शर्मा झे. रोंची गो. सँटनर ८२, अश्विन पायचित गो. सँटनर ०५, साहा खेळत आहे ३९, जडेजा झे. नीशाम (बदली खेळाडू) गो. सँटनर ०६, भुवनेश्वर खेळत आहे ०८. अवांतर १३. एकूण ६३.२ षटकांत ८ बाद २२७. बाद क्रम : १-१२, २-२४, ३-३४, ४-४३, ५-९१, ६-१०६, ७-२०९, ८-२१५. गोलंदाजी : बोल्ट १४-५-२८-२, हेन्री १५.२-२-४४-३, वॅगनर १३-२-४३-०, पटेल ८-०-५०-०, सँटनर १३-१-५१-३.