आता आनंदला गरज जांबुवंताची

By Admin | Updated: November 19, 2014 23:44 IST2014-11-19T23:44:53+5:302014-11-19T23:44:53+5:30

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतल्या आजच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विश्रांतीचा दुसरा दिवस होता आणि आनंद व कार्लसन दोघेही उर्वरित डावांच्या तयारीत गढून गेले

Now the need for joy is Jambuwantaka | आता आनंदला गरज जांबुवंताची

आता आनंदला गरज जांबुवंताची

जयंत गोखले
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतल्या आजच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विश्रांतीचा दुसरा दिवस होता आणि आनंद व कार्लसन दोघेही उर्वरित डावांच्या तयारीत गढून गेले असल्यास आश्चर्य वाटायला नको...! ज्याप्रमाणे सर्वशक्तिमान हनुमानाला जांबुवंताने प्रेरित केले होते, त्याचप्रमाणे आनंदलादेखील कुठल्या तरी जांबुवंताने जागृत केले तर धमाल येईल!
आनंद विश्वविजेतेपद मिळवू शकेल का? हा प्रश्न आज माझ्या अनेक मित्रांनी आणि नातेवाइकांनी (अर्थातच, यातले कुणीही कधीही बुद्धिबळ खेळलेले नाही) मला विचारून माझा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मागच्या वर्षी चेन्नईत झालेल्या पराभवाची बोच अजून प्रत्येक भारतीयाला जाणवत आहे आणि आनंदने कार्लसनला पराभूत करून याचा वचपा काढलाच पाहिजे, असेच मत बहुतेकांचे आहे.
आणि या वर्षीचा आनंदचा खेळ बघता ही गोष्ट आवाक्यातली नक्कीच आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते या वेळी कार्लसनने त्याच्या ओपनिंगच्या विभागात लक्षणीय सुधारणा केली आहे. कालच्या ८व्या डावातच कार्लसनने ज्या सहजतेने बरोबरी मिळविली, ती या प्रभुत्वामुळेच. अर्थात, मागच्या स्पर्धेपेक्षा या वेळचा आनंदचा खेळ देखील खूपच स्पृहणीय झाला आहे. कार्लसनप्रमाणेच ४-५ तास खेळण्याची आपली क्षमता असल्याचे आनंदने सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
आता आनंदला गरज आहे ती फक्त एका विजयाची. आणि जर हा विजय काळी मोहरी घेऊन मिळवला तर कार्लसनवरचे त्याचे मानसिक प्रभुत्वदेखील निर्विवादरीत्या प्रस्थापित होईल. मागच्या एका लेखात मी म्हटल्याप्रमाणे ‘विश्वविजेता’ हा परिपूर्ण असावाच लागतो आणि त्यासाठी काळी मोहरी घेऊन जिंकणे ही गोष्ट अनिवार्य आहे.
या स्पर्धेत अजून कार्लसनलादेखील काळ्या मोहऱ्यांनी विजय मिळविता आला नाहीये. उद्याच्या डावात कार्लसनच्या राजाच्या पुढच्या प्याद्याच्या सुरुवातीला आनंद काय उत्तर देतो, ते खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. जरी सिसिलीयन बचाव खेळून आनंदचा पराभव झाला असला तरी तो अगदी निसटता पराभव होता. हे आपणाला आठवत असेलच. त्याचबरोबर सिसिलीयन बचाव हे आनंदचे हुकुमी अस्त्र आहे, त्यामुळे केवळ एका पराभवाने खचून जावे अशी वेळ का यावी? आनंदने काय खेळावे अथवा काय खेळू नये, हे ठरवण्याची आणि सांगण्याची माझी पात्रता निश्चितच नाही. केवळ आनंदला त्याच्यातल्या सुप्त आणि अफाट सामर्थ्यांशी जाणीव व्हावी, एवढीच प्रार्थना आहे.

Web Title: Now the need for joy is Jambuwantaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.