आता लक्ष्य ‘११ साल बाद’चे!
By Admin | Updated: September 2, 2015 23:50 IST2015-09-02T23:50:02+5:302015-09-02T23:50:02+5:30
श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

आता लक्ष्य ‘११ साल बाद’चे!
नवी दिल्ली : श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध ११ वर्षांनंतर मालिका जिंकण्याचे आव्हान भारतापुढे असेल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात तीन टी-२०, पाच एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सुरुवातीला एकदिवसीय सामने आणि त्यांनतर कसोटी मालिका खेळविण्यात येईल. कसोटीस पाच नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. दरम्यान, आता विराट कोहलीचा संघ जेव्हा पुन्हा एकदा कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरेल तेव्हा त्यांना घरच्या परिस्थितींचा फायदा उठवत आफ्रिकेला ११ वर्षांनंतर पराभूत करण्याची चांगली संधी असेल.
असा आहे इतिहास..
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या. त्यात दक्षिण आफ्रिका संघाने सहा, तर भारताने दोन मालिका जिंकल्या आहेत. इतर तीन मालिका बरोबरीवर संपुष्टात आल्या.
भारताने या दोन्ही कसोटी मालिका घरच्या भूमीवर जिंकल्या आहेत. मात्र, यातील अखेरची मालिका त्यांनी २००४ मध्ये जिंकली होती. त्यानंतर मात्र भारताला मालिका जिंकता आली नाही. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाने २००४ मध्ये दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे जिंकला होता. ही मालिका जिंकत त्यांनी १-० ने विजय मिळवला होता.
त्यानंतर उभय संघांत पाच मालिका खेळल्या गेल्या. त्यात आफ्रिकेने दोन व इतर तीन मालिका बरोबरीवर सुटल्या होत्या.
भारताने २००४ आधी, १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले होते.