एमसीएला नोटीस !
By Admin | Updated: June 9, 2015 02:16 IST2015-06-09T02:16:17+5:302015-06-09T02:16:17+5:30
भूखंडाचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्याच्या कारणास्तव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एमसीएला नोटीस बजावली आहे.

एमसीएला नोटीस !
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील १३ एकरांचा भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) शैक्षणिक कामासाठी दिलेला असताना संबंधितांनी मात्र भूखंडाचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्याच्या कारणास्तव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एमसीएला नोटीस बजावली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये ही माहिती प्राप्त झाली आहे. एमसीएला दिलेल्या भूखंडाची माहिती त्यांनी एमएमआरडीएकडे विचारली होती. प्राधिकरणाने ५ मार्च २००४ रोजी एमसीएला ८० वर्षांच्या भाडेकरारावर ५२ हजार १५७ चौरस मीटर भूखंड दिला. त्यासाठी २ कोटी ६५ लाख ९८ हजार २०२ रुपये एवढे शुल्क आकारले. त्यापैकी ४६ हजार ९४१ चौरस मीटर खुले मैदान आणि ५ हजार २१५.७ चौरस मीटर बांधकामासाठी देत १.५ चटईक्षेत्र निर्देशांकाला मंजुरी दिली. १० टक्के जमिनीवर १५ टक्के बांधकाम, २३ टक्के जमीन ही तलाव, टेनिस कोर्ट, नेट्स किंवा तत्सम वापर आणि ६७ टक्के जागा सार्वजनिक वापरासाठी खुली ठेवण्यासह इनडोअर क्रिकेट अकादमीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश खुला ठेवावा, असे एमएमआरडीएने म्हटले. मात्र, एमसीएने हा भूखंड व्यावसायिक प्रयोजनार्थ न वापरण्याच्या अटीचे उल्लंघन करीत व्यावसायिक करारनामा केला. हे लक्षात घेता ‘तीन महिन्यांच्या आत योग्य पावले उचला किंवा भाडेकरार समाप्त करू,’ अशी नोटीस एमएमआरडीएने २ जून रोजी बजावली आहे. (प्रतिनिधी)