फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयला नोटीस
By Admin | Updated: August 21, 2015 22:43 IST2015-08-21T22:43:52+5:302015-08-21T22:43:52+5:30
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जला लीगमधून निलंबित करणाऱ्या न्या. लोढा समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सुपरकिंग्सच्या

फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयला नोटीस
चेन्नई : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जला लीगमधून निलंबित करणाऱ्या न्या. लोढा समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सुपरकिंग्सच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी बीसीसीआयला नोटीस बजावली.
मुख्य न्या. संजय किशन कौल आणि न्या. टी. एस. शिवज्ञानम यांच्या खंडपीठाने क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारलादेखील प्रतिवादी बनविण्यास परवानगी बहाल केली.
याच संघटनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आयपीएलच्या सहाव्या पर्वात झालेल्या स्पॉटफिक्सिंग तसेच सट्टेबाजी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होईल.
इंडिया सिमेंटच्या मालकीच्या चेन्नई सुपरकिंग्जने लोढा समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची
मागणी केली. समितीचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तसेच
नि:पक्ष सुनावणीच्या मूलभूत अधिकाराच्या सिद्धांताविरुद्ध असल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.
न्या. लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित केले. या प्रकरणी सीएसकेचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांना सट्टेबाजीप्रकरणी
दोषी धरले होते. याशिवाय,
कुठल्याही सामन्यात सहभागी
होण्यास बीसीसीआयने आजन्म बंदी घातली होती. (वृत्तसंस्था)