मेस्सी नव्हे, मीच सर्वोत्कृष्ट
By Admin | Updated: November 3, 2015 03:56 IST2015-11-03T03:56:55+5:302015-11-03T03:56:55+5:30
अर्जेंटिनाचा फॉरवर्ड आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी याच्यापेक्षा आपणच सरस आहे, असा दावा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केला आहे.

मेस्सी नव्हे, मीच सर्वोत्कृष्ट
माद्रिद : अर्जेंटिनाचा फॉरवर्ड आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी याच्यापेक्षा आपणच सरस आहे, असा दावा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केला आहे.
स्पेनचा क्लब रियाल माद्रिदचा स्ट्रायकर रोनाल्डोने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर तुम्ही गेल्या आठ वर्षातील कारकिर्द बघितली तर मी आघाडीवर आहे. अशी कामगिरी करणारा दुसरा कोण आहे का? हे तुम्ही मला दाखवा. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अॅथलेटिको माद्रीदकडून मिळालेल्या पराभवानंतर रोनाल्डो पहिल्यांदाच वृत्तपत्राशी बोलत होता. तो पुढे म्हणाला, तुम्ही नंबर वन आहात की नाही या प्रश्नापेक्षा तुम्ही किती स्पर्धा जिंकल्या आणि किती किताब पटकावले याला महत्त्व आहे. काही लोकांना मेस्सी उत्कृष्ट खेळाडू आहे, असे वाटते पण मला वाटते मी त्याच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे.
मला एका प्रतिस्पर्ध्याची गरज आहे, हा खेळाचाच एक भाग आहे, असे सांगून रोनाल्डो म्हणाला, मी १८, १९ वर्षाचा असल्यापासून लोक माझ्यावर टीका करीत आहेत. पण मी याला घाबरत नाही उलट यातून चांगली कामगिरी करण्याची मला प्रेरणा मिळते आहे. मला वाटते की, कोणत्याही खेळाडूला अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.
रोनाल्डो म्हणाला की, सराव आणि आठवड्यातून दोन-दोन सामने खेळण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवणे कोणत्याही खेळाडूला सहज शक्य होत नाही.(वृत्तसंस्था)